BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ मे, २०२३

सोलापूर जिल्ह्याला अवकाळी वादळाचा जोरदार तडाखा !


शोध न्यूज :सोलापूर जिल्ह्यातील काही भागाला अवकाळीच्या वादळाचा जोरदार तडाखा बसला असून पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे मोठी दुर्घटना घडली परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मोहोळ तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर मुक्या प्राण्याच्याही जीवावर निसर्ग उठला आहे.


संपूर्ण उन्हाळ्यात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ  घालून बळीराजाचे मोठे नुकसान केले आहेच पण आता उन्हाळा संपण्याची प्रतीक्षा असतानाच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा परिसरात वादळी वाऱ्याने मोठे  नुकसान केले आहे पंढरपूर शहर परिसरात या अवकाळीचा जोरदार तडाखा बसला. सोमवारी दिवसभर उन्हाचा कडाका आणि असह्य उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या वादळाने रस्त्यावरील नागरिकांची दैना उडवली. रस्त्यावर केवळ धुळीचे लोट दिसत राहिले. बादळी वारे इतके जोरदार होते की जागोजागी झाडे मोडून, उन्मळून पडली. शहरातील भोसले चौक पोलीस ठाण्याच्यासमोर तसेच इसबावी येथे रस्त्यांवर झाडे पडल्याने बाहतूक विस्कळीत झाली. शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला. श्रीविठ्ठल मंदिराजवळील रस्त्यांचर भाविकांना सावलीसाठी उभारलेले तात्पुरते  छत देखील या वादळी  वाऱ्याने कोसळले. अनेक भागातील विद्युत पुरवठा बराच काळ खंडित होता.


 पंढरपूर शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने आणि  पावसाने लोकांची मोठी दैना उडवली.. दिवसभर उन्हाळ्याची तीव्रता आणि उकाडा असताना अचानक वादळी वारे सुटले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. शहरातील बीजपुरवठा खंडित झाला. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी हद्दीत भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचा, लोक वसाहतीत असलेला  एक टॉवर या वादळामुळे कोसळला, हा टॉवर थेट एका राहत्या घरावर पडल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंढरपूर शहराला लागून असलेल्या लक्ष्मी टाकळी  उपनगरातील जयश्री रावण यांच्या जागेत असलेला भारत संचार निगमचा मोबाईल टॉवर वादळी वाऱ्यामुळे कोसळला. अवजड असलेला हा टॉवर थेट शेजारी असलेल्या   दिगंबर पवार यांच्या घरावर कोसळला. 


टॉवर कोसळल्यामुळे  पवार यांच्या घरासमोर लावलेच्या ब्रिझा कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा टॉवर कोसळला तेंव्हा सुदैवाने आणि योगायोगाने या परिसरात कुणी नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सदर टॉवरच्या संदर्भात आधीपासूनच लोकांत चर्चा असून आता तर ही घटना घडली असल्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे. सदर टॉवर लोक वसाहतीतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात यावे अशी मागणी होऊ लागली आहे. टॉवर थेट घरावर कोसळले असून पवार यांच्या गाडीचेही नुकसान झाले आहे, त्यामुळे भारत संचार निगम आणि जागा मालक यांच्यावर कारवाई तर व्हावीच पण टॉवर देखील हलविण्यात यावा, शिवाय झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी पवार यांनी केली आहे. टॉवर कोसळला त्यावेळी परिसरात नागरिक असते तर वाईट घटना समोर आली असती. लोक वर्दळीचा हा परिसर असून भविष्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी वेळीच दक्षता घेतली जावी अशी मागणी देखील पुढे येऊ लागली आहे.

✪ ✪ दुर्गंधी ! ✪➤ पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी हद्दीतील उपनगरात पुन्हा दुर्गंधी, सोलापुरे नगर, परिचारक नगरात तुंबलेल्या गटारीमुळे असह्य दुर्गंधी ! ✪


पंढरपूर शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. शेतातून घरी येताना पंढरपूर तालुक्याच्या पूर्व भागातील रोपळे, बाभूळगाव, सुस्ते, तुंगत, मेंढापूर  परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. (Unseasonal storm hits Solapur district, damage in Pandharpur, Mohol)या वादळात पंढरपूर शहरातील कराड नाका, इसवावी, अर्बन बँक परिसरात तसेच पंढरपूर पंचायत समितीसमोरील मोठी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक देखील ठप्प झाली होती.


महिला मृत्युमुखी !

अवकाळीचा मोठा तडाखा मोहोळ तालुक्यालाही बसला असून वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर येथे ही दुर्घटना घडली. कामासाठी शेतात गेलेल्या ३८ वर्षीय सुवर्णा ज्योतिबा घाडगे यांच्या अंगावर वीज कोसळली. वातावरण बदलू लागताच सुवर्णा आपल्या घराकडे निघाल्या होत्या पण वाटेतच त्यांच्या अंगावर वीज पडली आणि या घटनेत त्यांचा मृत्यू ओढवला. मोहोळ तालुक्यातच नजीक पिंपरी येथील युवराज पाटील यांच्या वस्तीच्या पाठीमागील बाजूला बांधलेल्या देशी गायीच्या गोठ्यात वीज पडून तीन देशी गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. यामुळे सुमारे एक लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.


मंगळवेढा तालुक्यातही फटका !

अचानक आलेल्या वादळी वाऱ्याचा फटका मंगळवेढा तालुक्यालाही बसला आहे, मेटकरवाडी पाटखळ परिसरात वादळी वारे नुकसान करून गेले आहे. समाधान वाघमोडे यांच्या जर्सी गायीवर वीज पडली आणि यात गायीचा मृत्यू झाला आहे. पाटखळ - खडकी रस्त्याच्या लगत असलेल्या गोठ्यात दहा बारा जर्सी गायी आहेत, यातील एका गायीचा मृत्यू झाला. काल रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास येथे वीज कोसळली आणि ही दुर्घटना घडली.


टाकळीत विजेचा खेळखंडोबा !

पंढरपूर शहराला लागून असलेल्या लक्ष्मी टाकळीमधील काही उप नगरात काल सोमवारी दिवसभर विजेचा खेळखंडोबा अनुभवायला मिळाला. तापमान वाढलेले असताना आणि प्रचंड उकाडा असताना काही उपनगरातील वीज दिवसभर पाठलागाचा खेळ खेळत होती. भर दुपारी कित्येक तास वीज गायब होती त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. टाकळी परिसरात नेहमीच वीज वितरणचा भोंगळ कारभार सुरु असून कसलीही पूर्वसूचना न देता, तासनतास वीज बेपत्ता असते. मागील काही महिन्यांपासून या परिसरात वीज वितरणचा हा गोंधळ सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात वीज बेपत्ता होत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. महावितरणला मात्र याचे काहीच सोयर सुतक नसल्याचे त्यांच्याच कार्यपद्धतीवरून समोर येत आहे.  







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !