शोध न्यूज : दोनशे रुपयांच्या लाचेच्या आरोपात महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा तब्बल पंचवीस वर्षे छळ झाला आणि अखेर तो निर्दोष असल्याचे समोर आले. दरम्यान पंचवीस वर्षांच्या काळात झालेले त्याचे अपरिमित नुकसान कधीच भरून येणार नाही.
काही वर्षांपूर्वी 'अंधा कानून' नावाचा एक चित्रपट आला होता. न केलेल्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होते, यावर हा चित्रपट बेतला होता. या चित्रपटातील कथा अनेकांच्या जीवनात सत्यात उतरताना देखील अधून मधून दिसते. कुठलाही गुन्हेगार, आपण गुन्हा केला नाही असेच सांगत असतो पण, न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालय आरोपीला दोषी ठरवते अथवा निर्दोष मुक्त करीत असते. अनेकदा न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावलेली असते. हा आरोपी वरच्या न्यायालयात गेल्यावर तो तेथे निर्दोष मुक्त होतो, असेही अनुभव येत असतात. दरम्यान मोठा कालखंड जात असतो आणि या काळात संबंधिताचे मोठे नुकसानही होत असते. सोलापूर जिल्ह्यात देखील असेच एक प्रकरण समोर आले असून, तब्बल २५ वर्षे यातना भोगल्यानंतर, महावितरणच्या एका कर्मचाऱ्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. पण तो पर्यंत त्याच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडून गेल्या असून, गेलेले दिवस त्याचे परत येणार नाहीत.
महावितरणच्या शेळके नावाच्या एका कर्मचाऱ्यास , दोनशे रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली, दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. सोलापूर विशेष न्यायालयात, त्याच्यावरील आरोप सिद्ध झाला होता आणि त्यामुळे त्याला २००२ मध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने दोषी धरल्याने आणि शिक्षा झाल्याने, साहजिकच महावितरणने शेळके यांना नोकरीतुक बडतर्फ केले. १६ वर्षे शेळके यांनी नोकरी केली होती, नोकरीतील अजून १५ वर्षांचा काळ शिल्लक राहिला होता पण, न्यायालयाच्या निकालाने त्याला नोकरी गमवावी लागली. विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात शेळके यांनी उच्च न्यायालयात अपील करून आव्हान दिले होते पण नोकरी गेल्यामुळे शेळके यांचे हाल सुरु झाले होते.
नोकरी गेली, न्यायालयाने दोषी धरून दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली. शेळके यांच्या आयुष्यात सगळेच वेगळे घडत असतांना, त्यांना त्यांची पत्नी, मुलेही सोडून गेली. कुटुंब दुरावले, जवळची माणसं बदलली. परिस्थिती बदलली की, नाती देखील बदलत जातात याचा अनुभव त्यांना येत राहिला पण त्यांनी हार मानली नाही. उच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल यावर त्याचा विश्वास होता. दोनशे रुपयांच्या लाचेचा गुन्हा त्यांना छळत होता. प्रतिकूल परिस्थिती देखील शेळके, उच्च न्यायालयात लढत राहिले आणि अखेर त्यांना न्याय मिळाला. उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. परंतु या दरम्यान २५ वर्षे उलटली होती. या काळात त्यांना अनेक वेदना आणि छळ सहन करावा लागला, निकराने त्यांनी या परिस्थितीशी लढा दिला आणि अखेर त्यांच्या सुखाची पहात उगवली.
उच्च न्यायालयात ते निर्दोष ठरले त्यामुळे, त्यांना अठरा वर्षांचा पगार आणि अन्य लाभ मिळतील. कदाचित सोडून गेलेली पत्नी, मुले परत येतील पण या काळात त्यांनी भोगलेल्या यातनाच्या खुणा तशाच राहतील, त्यांच्या आयुष्यातील वाया गेलेले दिवस कधीच परत येणार नाहीत. तरीही शेळके यांना आपल्याला न्याय मिळाल्याचा आनंदच आहे. (A bribe of two hundred rupees, twenty-five years of torture) दोन दशकांच्या या लढ्यात आपले एक कोटींचे नुकसान आणि दोन लाखांचा खर्च झाला असल्याचे शेळके यांनी सांगितले आहे. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण लढा देणार आहोतच पण, जो वेळ गेला, मनस्ताप सहन करावा लागला याची भरपाई कोण करणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !