BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मे, २०२३

शेततळ्याने घेतले दोन बळी, चिमुकल्यासह पित्याचाही बुडून मृत्यू !

 


शोध न्यूज : शेत तळ्याने आणखी दोन जीव घेतले असून या घटनेत पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. एकमेकांना वाचविण्यासाठी पती पत्नी आणि बालकाचा जीव धोक्यात आला परंतु पत्नीला वाचविण्यात यश आले.


अलीकडे शेत तेथे तळे असते, पाण्यासाठी आवश्यक म्हणून या तळ्याची योजना केली जाते. परंतु अशा शेततळ्यात पडून आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या तळ्यात पडलेले क्वचितच बचावले आहेत. लहान मुले, महिला यांचेच यात अधिक प्रमाण असून, घडत असलेल्या घटनांचा विचार करून अत्यंत दक्षता घेणे आवश्यक बनले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पंचतळे परिसरात अशीच एक अत्यंत अप्रिय अशी दुर्घटना घडली आहे. दीड वर्षाचा मुलगा खेळता खेळता या तळ्यात पडला. त्याचा तर जीव गेलाच पण, त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या त्याच्या पित्याचा देखील याच तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. अत्यंत थरारक अशी ही घटना घडली आहे.  


मृत सत्यवान गाजरे यांच्या वडिलांच्या नावे जांबूतजवळ पंचतळे येथे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र व गार्डन मंगल कार्यालय असून, मागील बाजूस जवळपास २० फूट खोल शेततळे आहे.या तळ्यात ही थरारक घटना घडली. दीड वर्षाचा चिमुकला राजवंश गजरे आणि त्याचा २५ वर्षे वयाचा पिता सत्यवान गाजरे यांना या तळ्यात जलसमाधी मिळाली.  सत्यवान, पत्नी स्नेहल व मुलगा राजवंश याच्यासह या कृषी पर्यटन केंद्रात आले होते. यावेळी फेरफटका मारत असताना, दीड वर्षे वयाचा राजवंश खेळता खेळता शेततळ्याकडे गेला आणि तळ्यात पडला. हा प्रकार पाहताच त्याचा पिता सत्यवान याने तळ्यात धाव घेतली. चिमुकल्या मुलाला वाचविण्यासाठी सत्यवान गाजरे यांनी तळ्यात उडी घेतली. परतू मुलाला वाचाविण्याऐवजी ते स्वत:च या पाण्यात बुडू लागले. त्यांना पोहोता येत नव्हते, तरी देखील त्यांनी मुलाला वाचविण्यासाठी हे धाडस केले होते.


लहान मुलगा राजवंश आणि त्याचा पिता, असे दोघेही तळ्यात बुडू लागले. हा प्रकार सत्यवानची पत्नी स्नेहल यांनी पाहिला. कसलाही विचार न करता त्यांनीही थेट तळ्यात उडी घेतली. मुलगा आणि पती डोळ्यादेखत बुडत होते, त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी स्नेहल यांनीही असेच धाडस केले पण त्या देखील या तळ्यात बुडू लागल्या. परंतु त्यांनी आरडाओरडा केला, त्यांच्या ओरडण्याचा आवाज आजूबाजूला गेला आणि जवळच्या लोकांनी तळ्याकडे धाव घेतली. त्यांनी स्नेहल यांना पाण्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला पण, त्यांचा दीड वर्षांचा मुलगा आणि पती यांचा मात्र मृत्यू झाला होता. या तिघांना पाण्याबाह्रेर काढण्यात आले तेंव्हा तिघेही बेशुद्ध होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलेही, परंतु राजवंश आणि त्याचे वडील सत्यवान यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 



शेततळे हे प्राणघातक ठरत असून, शेतकऱ्यांनी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार अशा दुर्घटना घडत असल्याने यातून काही धडा घेणे आवश्यक बनले आहे. (Father and son died after drowning in farm pond) खेळता खेळता चिमुकला तळ्याकडे गेला आणि त्याच्यासह त्याच्या पित्याचाही जीव यात गेला. सुदैवाने स्नेहल या बचावल्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !