शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून सुस्ते येथे एकाच रात्रीत झालेल्या अनेक चोऱ्यामुळे तर चोरट्यांची दहशत निर्माण झाले आहे. मागील वर्षी देखील सुस्ते येथे एका रात्रीत अनेक दुकाने फोडण्याची घटना घडली होती.
पंढरपूर तालुक्याला चोरीच्या घटना काही नव्या नाहीत पण मागील काही काळात ऐन उन्हाळ्यात चोरांनी लोकांची झोप उडवली आहे. पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात चोरट्यांचा वावर असल्याची चर्चा नागरिकांना सावध करीत होती. मागील काही काळात चोऱ्या, घरफोड्या होतच आहेत पण आता तर सुस्ते येथे एकाच रात्री तब्बल सात घरफोड्या झाल्या आहेत. साहजिकच या घटनेने पंढरपूर तालुका हादरून गेला असून लोक चिंतेत आहेत. चोरांचे धाडस देखील वाढलेले असल्याचे या घटनेतून दिसून येऊ लागले आहे. गावागावात लोक एकमेकांना सतर्क करत आहेत आणि अशाच काळात सुस्ते येथे एक दोन नव्हे तर एकाच रात्री एकाच गावात सात घरे लुटून चोरटे पसार झाले आहेत आणि केवळ अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्याकडे पहात बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यातील अन्य गावात देखील मोठी दहशत निर्माण झाली आहे.
एकाच गावातील ७ घरे लुटण्यात आली आणि जवळपास पावणे सहा लाखांची चोरी करून चोरटे डोळ्यादेखत पसारही झाले आहेत. सुस्ते येथील ग्रामपंचायत सदस्य विष्णू गावडे यांच्या घरात शिरून चोरट्यांनी सहा तोळे सोने आणि १ लाख २० हजाराची रोख रक्कम पळवली. एवढी मोठी चोरी एकाच घरात केल्यावर चोरांचे समाधान झाले नाही. त्यांनी गावडे यांच्या शेजारी असलेल्या सैफन शेख यांच्या घरावर देखील डल्ला मारला. त्यांच्या घरात घुसून ५५ हजार रुपये रोख आणी दीड ग्रॅम सोन्याचे दागिने चोरण्यात आले. सैफन शेख यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे, त्यासाठी ते पैशाची जुळवाजुळव करीत होते. घराच्या बांधकामासाठी जुळवाजुळव केलेली ही रक्कम एका रात्रीत चोरट्यांनी लंपास केली आहे. आधीच अडचणीत असलेले शेख, या घटनेने अधिकच अडचणीत आले आहेत. कसे तरी रक्कम जुळवून बांधकाम करीत असलेल्या शेख यांना, डोक्याला हात लाऊन बसण्याची वेळ आली आहे.
गावडे आणि शेख यांच्या घरात चोरी करून आणि रोख रक्कम मिळाली असतानाही या चोरट्यांचे समाधान होत नव्हते. त्यांनी सरदार शेख, आरिफ शेख आणि अमीर शेख यांच्याही घरात हात साफ केला आहे. अमीर शेख यांच्या घरात घुसल्यावर चोरट्यांनी गुंगीचे औषध वापरले, शेख यांच्याकडे पाहुणे आले होते, हे पाहुणे आणि घरातील लोक रात्री झोपेत होते. छोटे घर आणि पाहुणे आलेले असल्यामुळे घरात दाटी झालेली होती. अशा परिस्थितीतच हे सगळे झोपलेले असताना चोरते घरात घुसले. चोरट्यांनी चेहऱ्यावर गुंगीचे औषध मारले आणि या घरातील तीन तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोकड देखील चोरून नेली सैफन शेख यांच्या घरात चोरटे शिरले तेंव्हा त्यांच्या हालचालीचा सुगावा लागला. चोरटे शेख यांच्या घरातील कपाटातून रक्कम चोरी करीत असताना सैफन शेख आणि त्यांच्या पत्नीला हे चोरटे दिसले. त्यांनी लगेच सावध होऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. शेख पती पत्नी सावध झाल्याने चोरटे पळू लागले आणि शेख यांनी त्यांचा पाठलाग देखील केला परंतु अंधाराचा फायदा घेत चोरते पसार झाले असल्याचेही सांगितले जात आहे.
एकाच रात्रीत चोरट्यांनी एकाच गावात असा धुमाकूळ घटल्याने सुस्ते परिसर आणि पंढरपूर तालुका देखील हादरून गेला आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली. श्वानपथक देखील पाचारण करण्यात आले परंतु चोरांचा काही मागमूस लागला नाही. सुस्ते येथील या घटनेमुळे मात्र परिसर आणि पंढरपूर तालुक्याची झोप पुन्हा उडाली आहे. (Seven houses stolen in one night in Pandharpur taluka) नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत महत्वाचे झाले असून उकाड्यामुळे गच्चीवर किंवा घराबाहेर झोपणे देखील धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे चोरी टाळण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !