BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ मे, २०२३

पत्रकारावर पोलिसांचा गोळीबार, सोलापूर - पुणे महामार्गावर थरार !

 




शोध न्यूज : तब्बल पाच कोटी खंडणी मागणाऱ्या सोलापूरच्या कथित पत्रकारांवर पोलिसांनी गोळीबार केला असून सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर, पाटस जवळ ही थरारक घटना घडली आहे. 


सोलापूर येथील खंडणीखोर पत्रकाराला पकडण्याच्या प्रयत्नात पोलीस असताना, गोळीबार करण्याची ही घटना घडली असून यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रकारही घडला आहे. यात दोघे जखमी देखील झाले आहेत. पुणे येथील एका व्यावसायिकास, खोट्या बातम्या प्रसिद्ध करून बदनामी करण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात येत होती. सदर तोतया पत्रकाराला पकडण्यासाठी पोलिसांनी योजना आखली. या दरम्यान पाटस टोल नाक्याजवळ ही थरारक घटना घडली आहे. पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न संशियत आरोपींनी केला, यावेळी पोलिसांनी गोळीबार केल्याची घटना घडली. अखेर पोलिसांनी सोलापूर येथील महेश सौदागर हणमे  आणि दिनेश हणमे या दोघांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. सोलापूर येथील कथित पत्रकार महेश हणमे  याने सदर व्यावसायिकाकडून आजवर तब्बल तीन लाख ८० हजार रुपयांची खंडणी वसूल केली आहे. 


खराडी येथील एका व्यावसायिकाला महेश हा पत्रकार असल्याचे सांगून खोट्या बतम्या देऊन बदनामी करतो, अशी ऑगस्ट २०२२ पासून धमकी देत होता. तसेच खोट्या पोलिस केसमध्ये अडकविण्याची धमकी देत होता. महेश हणमे याने पुण्यातील या व्यावसायिकाकडून तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ३ लाख ८० हजार रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली आहे. फिर्यादी व्यावसायिक रक्कम देत असल्याचे दिसल्यावर आरोपींच्या तोंडाला अधिकच पाणी सुटले आणि त्यांनी सातत्याने खंडणीची मागणी सुरु केली. तब्बल पाच कोटींच्या खंडणीची त्यांची मागणी होती. सदर दोघांनी या व्यावसायिकाला ५० लाख रुपये घेवून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे येण्यास सांगितले होते. व्यावसायिकाने मात्र खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली आणि याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुन्हा काल या दोघांनी सदर व्यावसायिकाला लोणी काळभोर येथे बोलावले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा रचला होता.

 

महेश याने फिर्यादीकडून आतापर्यंत ३ लाख ८० हजार रुपये खंडणी उकळली आहेत. तरीही तो सातत्याने खंडणी मागत होता. पैसे देतात म्हटल्याने त्याने त्यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यांना तातडीने ५० लाख रुपये घेऊन मोहोळ येथे बोलावले होते. याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांना त्याने आज लोणी काळभोर येथे बोलावले होते. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांच्या सहकार्यांनी सापळ्याचे आयोजन केले. खंडणी विरोधी पथकाने यवत टोलनाक्याजवळ हा सापळा रचला. व्यावसायिकाने त्यांना बोलण्यात गुंतवून यवतजवळ बोलावले. सदर व्यावसायिकाच्या सोबत  गाडीत साध्या वेशात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण होते. हणमे याला संशय आल्याने त्याने फिर्यादींना खाली बोलावून घेत शिवीगाळ केली. एकाने गाडी चालू करुन पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खाली उतरलेले चव्हाण यांनी बाजूला उडी मारत स्व:चा बचाव केला. आपल्याकडील पिस्टलमधून दोन गोळ्या टायरवर फायर केल्या. पळून जाणाऱ्यांना पकडताना सुरेंद्र जगदाळे हे जखमी झाले.


आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आरोपींवर गोळीबार केला. गोळ्या गाडीच्या पाठीमागील टायरवर लागल्या आहेत. पोलिसांनी पाठलाग करून महेश सौदागर हनमे आणि दिनेश हनमे यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यातूनही सदर दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत परंतु या घटनेत पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण आणि पोलीस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे ही मात्र जखमी झाले आहेत. (Police firing on fake and extortionist journalist of Solapur)  पुण्यातील व्यावसायिकास ब्लॅकमेल करीत तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत पाच कोटींची खंडणी मागत होते परंतु अखेर तुरुंगात जाऊन बसण्याची वेळ आली. यातील एक संशयित आरोपी महेश सौदागर हणमे  याच्या विरोधात सोलापूर येथे बलात्काराचाही एक गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबाराच्या या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे.


चवली पावलीचे पत्रकार !

अलीकडे तथाकथित पत्रकारांचा मोठा सुळसुळाट सगळीकडे झाला असल्याचे दिसत आहे. कसलाही अभ्यास नसताना आणि बातमी कशाशी खातात याची कसलीही माहिती नसताना अनेकजण पत्रकार म्हणून मिरवत असतात. केवळ मिरवत नाहीत तर सकाळपासून रात्रीपर्यंत चवलीपावलीच्या मागे लागलेले असतात. कुणी वेब पोर्टल काढून तर कुणी यु ट्यूब चॅनेलचे नाव सांगत पैसे उकळण्याचे धंदे करीत असतात. गावोगाव अशा भुरट्यांची गर्दी झाली असून पत्रकारितेतील गंधही नसणारे, पत्रकार म्हणून मिरवताना दिसतात. पन्नास रुपयांपासून शंभर दोनशे रुपयांचा वास घेत हे फिरत असतात. अशा भुरट्या मंडळींमुळे पत्रकारिता बदनाम होऊ लागली आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांकडे पाहण्याची लोकांची 'नजर' बदलताना दिसत आहे. समाजात याची सतत चर्चा तर असतेच पण शासकीय अधिकारीही अशा लोकांमुळे त्रस्त होऊन गेले आहेत. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !