शोध न्यूज : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आरोप करीत निर्मला यादव यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने पुन्हा एकदा हा विषय चव्हाट्यावर आला असून सोलापूर जिल्ह्यासह भाजपात मोठी खळबळ उडाली आहे.
काही काळापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर देशमुख यांना भाजपने पदावरून बडतर्फ केले होते. या घटनेच्या नंतर देखील सदर महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील आणि भाजप खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांच्यावर आरोप केले होते. फेसबुकवरून एक पोस्ट शेअर करीत निर्मला यादव या महिलेने "श्रीकांत देशमुख यांच्याशी आपला विवाह झालेला असून, आपणास नांदायला नेले नाही तर आपण आत्महत्या करणार आहोत, आपल्या आत्महत्येस श्रीकांत देशमुख यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जबाबदार असतील असे म्हटले होते. आज मात्र या निर्मला यादव यांनी खरोखरच असा प्रयत्न केला आणि एकच खळबळ उडाली आहे.
आज निर्मला यादव यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यातून त्या बचावल्या आहेत. त्यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या महिलेने व्हिडीओ चित्रित केला असून त्यात भाजप नेत्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. श्रीकांत देशमुख यांचे नाव घेवून त्यांना शेवटचं बोलायचं आहे असे या व्हिडीओत म्हटले आहे शिवाय "मी आता जगण्याच्या लायकीची राहिली नाही, माझ्या जागी दुसरी मुलगी असती तर तिने 'हे' आधीच केले असते, भाजपच्या लोकांना कळावे म्हणून आपण हे पाउल उचलत आहे. माझ्याकडे काही पर्याय नसल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. माझ्या मृत्यूला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीकांत देशमुख, त्यांचे दोन्ही भाऊ हे जबाबदार असतील. भाजपच्या नेत्यांना सांगून माझ्यावर एक केस केली आहे. त्यामुळे मला हे सर्व अनावर झाले आहे, त्यातून मी माझे जीवन संपवत आहे", असा व्हिडीओ तयार करून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान आज निर्मला यादव यांनी,सांगोला तालुक्यातील जवळा येथील श्रीकांत देशमुख यांच्या, देशमुख वस्ती येथील घरापुढे येवून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. श्रीकांत देशमुख यांचे वडीलांना भेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र श्रीकांतचा भाऊ लालासाहेब देशमुख यांनी, तुमचा नवरा येथे रहात नाही, जिथे रहातो तिकडे जावा म्हणून हाकलून दिले. त्यानंतर दुपारी ही अघटीत घटना समोर आली आहे. निर्मला यादव या महिलेने भाजपचा बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्याकडून प्रतारणा झाल्याचा आरोप सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओद्वारे करून दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. यासाठी निर्मलाने एरंडाच्या बिया खाल्या. तशी माहिती त्यांनीच पोलिसांना दिली आहे.
एरंडीच्या बिया खाल्ल्यानंतर सदर महिलेने थेट सांगोला पोलीस ठाणे गाठले आणि तेथे, जाऊन, आपण एरंडी बिया खाल्लेल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तातडीने या महिलेस सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. (Woman attempts suicide by accusing BJP leaders) रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात येत असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी सदर महिलेच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
भाजपचे तत्कालीन सोलापूर जिल्हाध्यक्ष देशमुख आणि महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा विषय राज्यभर चर्चेला आला होता. सदर महिलेने फेसबुक पोस्ट करून आत्महत्येचा विचार यापूर्वीच जाहीर केला होता. या महिलेने आपल्या तक्रारीचे काही व्हिडीओ तयार केले होते आणि ते व्हायरलही झालेले आहेत. आता मात्र आजची मोठी घटना घडली असून याचे पडसाद राज्यात उठण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !