शोध न्यूज : महिला नेत्यांच्या बाबत अपशब्द वापरणे, एका भाजप नेत्याला भलतेच महागात पडले असून, न्यायालयाने या नेत्याला तब्बल एक कोटींचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे, वाचाळ राजकारणी मंडळींच्या जिभेला चांगलाच लगाम बसणार आहे.
मागील काही काळापासून राजकारणाची पातळी भलतीच घसरली आहे त्यामुळे राजकारण प्रदूषित झाल्याचे वाटत आहे. राजकारण हे परस्परांशी शत्रुत्व जपण्याचे आणि बदला घेण्याचे क्षेत्र असल्याचे चित्र, काही राजकारणी नेत्यांनी निर्माण केले आहे. परस्परांवर टीका करणे स्वाभाविक असले तरी या टीकेची पातळी अत्यंत खालावली असून, सामान्य जनतेला देखील हे ऐकायला आणि पाहायला नकोसे झाले आहे. 'सत्तेसाठी काहीही' हा एकमेव प्रकार सुरु आहे. एकमेकांबद्धल बोलताना अनेकांना काही ताळतंत्र उरलेले दिसत नाही. काही प्रकरणे न्यायालयात जातात. त्याचे पुढे काय झाले हे मात्र समजत नाही. अनेकदा नंतर तडजोड केली जाते त्यामुळे फारसे भय नसल्याचे चित्र निर्माण होते.
आपले काहीही होत नाही अशा भ्रमात काही नेत्यांची जीभ अगदीच सैल सुटलेली असते. गटारात बुडवून असभ्य शब्द बाहेर काढले जातात. काही बोलले तरी काही फरक पडत नाही, अशा भ्रमात असलेल्या काही राजकीय नेत्यांना मात्र श्रीरामपूर न्यायालयाचा निकाल, जिभेला लगाम लावण्यास भाग पाडणार आहे. एका महिला नेत्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. श्रीरामपूर दिवाणी न्यायालयाने यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्याला तब्बल एक कोटींचा दंड ठोठावला आहे. श्रीरामपूरच्या तत्कालीन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याबद्दल 2021 साली या भाजपचे प्रकाश चित्ते यांनी अपशब्द वापरले होते. त्यामुळे आदिक यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सदर प्रकरणात न्यायालयाने हा एक कोटी रुपयांचा दंड सुनावला आहे.
श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी चौकात पुतळा बसवण्याच्या प्रकरणातून हा वाद निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून तत्कालीन नगराध्यक्षा आणि भाजप नेत्यात वाद सुरु झाला होता. त्यातूनच त्यावेळी शिवजयंतीला यावरून आंदोलन झाले होते. या आंदोलनावेळी आणि त्यानंतरही पत्रकारांशी बोलताना, भाजप पदाधिकारी प्रकाश चित्ते यांनी नगराध्यक्षा आदिक यांच्याविरोधात आरोप केले होते. पुतळ्याची जागा तत्कालीन नगराध्यक्ष आदिक यांच्याकडून बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपचे चित्ते यांनी केला होता. त्यातून आपली बदनामी झाल्याची भावना आदिक यांची झाली आणि त्यांनी थेट न्यायालय गाठले. चित्ते यांच्याविरोधात त्यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.
तत्कालीन महिला नगराध्यक्षा आदिक यांनी सन २०२१ मध्ये श्रीरामपूर जिल्हा व सत्र न्यायालयात ५ कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता. याची सुनावणी होऊन चित्ते यांना न्यायालयाने दोषी ठरवले. सदर खटल्यातील पुरावे आणि साक्षीदार तपासल्या नंतर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने, भाजप नेते प्रकाश चित्ते यांनी, आदिक यांची मानहानी केल्याचा निष्कर्ष काढत, मानहानीपोटी आदिकांना १ कोटी रुपये देण्याचे आदेश दिला असल्याची माहिती, अनुराधा आदिक यांचे वकील तुषार बी. आदिक यांनी दिली आहे. (Abusing women leaders, BJP leader fined Rs one crore ) बेलगाम आणि वाचाळ राजकीय मंडळींसाठी ही मोठी चपराक असून, अनेकांच्या सैल सुटलेल्या जीभा आता बत्तीशीच्या आत शांत राहतील असा विश्वास अनेकांना वाटू लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !