BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ मे, २०२३

संतप्त तरुणाने कृषी कार्यालयावर उधळल्या टोपली भरुन नोटा !




शोध न्यूज : शासकीय विभागाच्या अनास्थेवर संतापून एका तरुणाने जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर चक्क नोटां उधळल्या आणि आपल्या मागणीकडे लक्ष वेधले आहे. अशा प्रकारे नोटा उधळण्याची राज्यातील ही दुसरी घटना आहे. 


शासकीय विभागाची अनास्था आणि लाचखोरी यामुळे सामान्य जनता भरडून निघत असते. सामान्य कामे देखील वेळेवर होत नाहीत आणि लाच दिली की कसलेही काम झटपट होते. रोज कित्येक अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात तुरुंगात जात आहेत परंतु शासकीय विभागातील लाचखोरी थोडीशीही कमी होताना दिसत नाही. अलीकडेच फुलंब्री येथील एका तरुण सरपंचाने गट विकास अधिकारी कार्यालयासमोर नोटांची उधळण केली होती. पैठण पंचायत समितीसमोर एका सरपंचाने पैसे उधळले होते. बीडीओंवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन सरपंचाने खळबळ उडवून दिली होती. आज पुन्हा मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातील कृषी कार्यालयामध्ये असाच प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांचे सरकार असल्याचा ढोल बडवला जात असतानाच राज्यातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे हेच अशा घटनातून समोर येत आहे. 


नकली बियाणे, औषधे आणि खते यांचा सूळसुळाट सगळीकडेच असतो, या फसवणुकीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडतो आणी अडचणीत येत असतो. अशा कंपन्यांवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक असते पण सरकारी यंत्रणा यासाठी सक्षमपणे काम करीत नाही आणि त्याचा परिणाम सामान्य शेतकऱ्यास भोगावा लागत असतो. खरीप हंगामाच्या तोंडावरच बोगस कीटकनाशक विकणाऱ्या कंपन्याची घुसखोरी झाली असल्याने शेतकरी फसला जात आहे. ही बोगस कीटकनाशके फवारली जात असताना बळीराजाला विषबाधा होत आहे परंतु शासनाचा कृषी विभाग या कंपन्यांवर कारवाई करीत नाही असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेगळ्याच प्रकारे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पैसे घ्या पण बोगस कंपन्यांवर कारवाई करा अशी मागणी करीत जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर टोपलीभरून नोटांची उधळण केली. 


हिंगोली कृषी अधिकारी कार्यालयासमोर झालेला हा राडा पाहण्यासाठी देखील अनेकांनी गर्दी केली होती. बोगस कीटकनाशक कंपन्यांची चौकशी करून कारवाई का केली जात नाही? असे विचारण्यात आले. जवळपास सातशेहून अधिक बोगस कंपन्या पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशक विक्री करीत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. कंपन्यांवर कारवाई करावी यासाठी वारंवार निवेदने देऊनही अभय का? देण्यात येते असा जाब विचारला. पैसे हवे असतील तर शेतकरी देतील; पण त्या कंपन्यांवर कारवाई करा असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे यांनी पैसे उधळले. यावेळी जिल्हा कृषी कार्यालयात देखील खळबळ उडाली आणि कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर आले. जिल्ह्यात आलेल्या कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठवावेत त्यानंतर अप्रमाणित नमुने असलेल्या कंपन्यांकडे कारवाई करावी अशी मागणी केली. यासंदर्भात सुमारे एक महिन्यापूर्वी निवेदन दिले होते. एक महिन्यांपुर्वी निवेदन दिले असतानाही संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोटांची उधळण करून या मागणीकडे लक्ष वेधले आहे. आता जिल्हा कृषी विभाग काय कारवाई करतोय याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत.


फुलंब्री येथे गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयावर अशाच प्रकारे नोटा उधळून एका तरुण सरपंचाने राज्याचे लक्ष वेधले होते. ही घटना घडली तेंव्हा राज्य शासनाने तातडीने दखल घेतली होती आणि गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई देखील केली होती.(An angry young man threw notes at the agriculture office)  आता या दुसऱ्या घटनेची कशा प्रकारे दखल घेतली जातेय याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्याची फसवणूक होत असताना आणि त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असतानाही शासनाचा कृषी विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा संताप अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !