शोध न्यूज : पंढरपूर पोलिसांना चोरट्यांची एक टोळी सापडली असून ही टोळी सोलापूर जिल्ह्यातीलच असल्याचे समोर आले आहे. कर्नाटकसह विविध भागात ते आपली काळी करामत दाखवत होते, अखेर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे.
गुन्हेगारी विश्वात असंख्य टोळ्या कार्यरत असतात. सापडलेल्या टोळ्या या दूर परिसरातील असल्याचे अनेकदा दिसून येत असते. पंढरपूर पोलिसांच्या हाती लागलेली टोळी मात्र, सोलापूर जिल्ह्यातील असून त्यांची मजल कर्नाटक राज्यापर्यंत होती. पोलिस गुन्ह्याचा तपास करताना ही टोळी उघडकीस आली असून, पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातून २ ट्रॅक्टर, २ ट्रॉली,नांगर, रोटर, इंजिन तसेच तब्बल ३१ मोटारसायकली चोरणाऱ्या चौघांना शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने पकडून गजाआड केले.त्यांच्याकडून तब्बल ३८ लाख ७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
सोमनाथ महादेव दुधाळ (वय २२, रा. मेटकरवस्ती, ता.सांगोला), सचिन शिवाजी सरगर (वय २२, रा. तनाळी, ता. पंढरपूर), सत्यवान रामहरी भोसले (वय ३०, रा. पडसाळी, ता.उ. सोलापूर) व सागर सुरेश चव्हाण (वय २१, रा. मोहोळ) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. शहर व तालुक्यात मोटारसायकली चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याअनुषंगाने दाखल गुन्ह्यांचा बारकाईने तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे यांना यातील सोमनाथ दुधाळ हा चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. (Gang of thieves arrested in Solapur district)त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करून पोलिसांनी त्याला बोलते केले.
सोमनाथ हा साथीदारांसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, सातारा, सांगली आदी भागांमधून अनेक मोटारसायकली, १ ट्रॅक्टर, १ ट्रॉली, लोखंडी पल्टी नांगर, फण, रोटर, इंजिन पंप तसेच कनाटकातील अथनी येथून १ ट्रॅक्टर, ट्रॉली चोरल्याचे कबूल केले. त्यामुळे पोलिसांनी त्याचे साथीदार असलेल्या अन्य सदस्यांना देखील ताब्यात घेतले. अधिक तपास करून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. या टोळीतील प्रमुख असलेला, सांगोला तालुक्यातील सोमनाथ दुधाळ याच्यापासून या टोळीचा जन्म झाला होता. सोमनाथ कर्जबाजारी झाल्यामुळे तो या चोरीच्या मार्गाकडे वळला. सुरुवातीला त्याने एका ट्रॅक्टरची चोरी केली. चोरलेला ट्रॅक्टर वापरून तो शेती करू लागला. चोरीचा ट्रॅक्टर असतानाही त्याच्यापर्यंत कुणीच पोहोचले नाही, त्यामुळे ही चोरी खपून गेली. चोरी खपू शकते हे त्याच्या लक्षात आले आणि त्याला हा मार्ग सापडला. त्याने ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच शेतीसाठी लागणारी अन्य औजारे चोरायला सुरुवात केली. त्याची एक टोळी बनली आणि शेवटी गजाआड गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !