शोध न्यूज : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून पुढील ४८ तास हे अत्यंत महत्वाचे आहेत. सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट केले असून इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा चिंतेचे ढग जमा झाले आहेत.
उन्हाळ्याचे दिवस असले तरी, उन्हाळ्यासोबत पावसाळा देखील सुरु असून, अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. निसर्गाचे हे संकट जाण्याची प्रतीक्षा असताना, हवामान विभाग मात्र सतत नवनवे अंदाज व्यक्त करीत आहे. विविध भागात हे अवकाळी संकट कोसळत आहे. शेतकऱ्याला पुरते उद्ध्वस्त करून टाकले असतानाही अवकाळी धिंगाणा थांबायचे नाव घेत नाही. एप्रिल महिना आज संपत आहे पण अवकाळीचे थैमान मात्र सुरूच असून, ते पुढेही सुरु राहणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांना आधीच मोठा तडाखा दिलेला आहे. रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. ही परिस्थिती बदलण्याची वाट बळीराजा पहात आहे. दुसरीकडे हवामान विभागाने पुन्हा चिंता वाढवणारी बातमी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, तर मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. आगामी दोन दिवस चिंतेचे असून मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, पाउस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Unseasonal rain! Rain again in two days in Maharashtra) आज ३० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात आलेले हे संकट पुरते उद्ध्वस्त करू लागले आहे. हिंगोली येथे तर पावसाळा असल्याप्रमाणे अडीच तास मुसळधार पाऊस कोसळला आहे. उन्हाळा आहे की पावसाळा ? असा प्रश्न या पावसाने निर्माण केला आहे. या पावसाने काढून ठेवलेल्या हळद पिकाचे नुकसान केले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यवतमाळ येथेही असे नुकसान समोर आले असून जवळपास सहाशे हेक्टर क्षेत्रातील पिक आणि फळबागा या पावसाने उद्ध्वस्त केल्या आहेत. घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अमरावती जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसाने आणि वादळी वाऱ्याने झाडे मुळासकट उपटून खाली कोसळली आहेत. अनेक झाडे रस्त्यावरच पडली असल्यामुळे, जागोजागी वाहतूक प्रभावित झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !