BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मार्च, २०२३

रुपया पाहून धाय मोकलून रडला शेतकरी !

 


शोध न्यूज : मुलांच्या शाळेची फी कशी भरू ? असा सवाल मायबाप सरकारला करीत एक शेतकरी धाय मोकलून रडला आणि शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे (price of onion) हे पुन्हा एकदा समोर आले आहे. 


शेतकऱ्याच्या संदर्भात राजकारणात नेहमीच मोठ्या मोठ्या बाता मारल्या जातात पण शेतकऱ्याची अवस्था जैसे थे नव्हे तर अधिकाधिक बिकट होत चालली आहे. शेतकरी दिवसरात्र शेतात राबतो, काळजापलीकडे आपल्या पिकांना जपतो आणि आपल्या घामाने पिके वाढवतो पण बाजारात गेल्यावर त्याला आपल्या घामाची किंमत शून असल्याचे कळते. पाचशे किलो कांद्याचा दोन रुपयांचा चेक मिळालेल्या सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकऱ्याचा वेदना उभ्या महाराष्ट्राने पहिल्या आहेत. आणखीही काही शेतकरी बांधवांची दयनीय अवस्था समोर आली आहे. सरकार मात्र 'शेतकऱ्यांचे सरकार' असल्याचे सांगत आहे पण प्रत्यक्षात या बळीराजाला कुणीच वाली नाही हेच पुन्हा पुन्हा आणि रोज एकेका घटनेतून दिसत आहे. आता पुन्हा एकदा बळीराजाची दयनीय आणि केविलवाणी अवस्था झाल्याचे अत्यंत भयानक चित्र समोर आले आहे. एक रुपया पाहून या शेतकऱ्याने आक्रोश केला. धाय मोकलून रडत त्याने मायबाप सरकारला सवाल विचारला आहे. 


कष्ट करून आणि पैसा खर्च करून पिकवलेला कांदा बाजारात जाताच बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणत असल्याचे सातत्याने दिसत असताना जीवापाड जपलेला कांदा या बळीराजाने बाजारात नेला. १७ गोण्यांचे बक्कळ पैसे येतील ही आशा धरून बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकरी नामदेव लटपटे बाजारात कांदा घेवून गेले. १७ गोणी कांद्याचे पैसे घेवून मुलांची शाळेची फी भरायची असे त्यांचे नियोजन होते पण त्यांच्या हातात केवळ एक रुपया आला. १७ गोणी कांदे विकून केवळ एक रुपया हातात आल्याचे पाहून नामदेव लटपटे यांच्या डोक्यावरील आभाळ फाटले, पायाखालील जमीन सरकली आणि डबडबल्या डोळ्यांनी ते खाली बसले. तीन एकर क्षेत्रात त्यांनी कांद्याची लागवड केली होती आणि हा कांदा पिकविण्यासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला होता. कांदा चांगल्या गुणवत्तेचा पिकला असल्यामुळे त्यांना मोठी आशा होती आणि कुटुंबातील आर्थिक अडचणी सोडविण्यास चांगली मदत होईल अशी आशाही त्यांना लागलेली होती.कौटुंबिक खर्चासाठी आणि मुलांच्या शाळेच्या फी साठी हा कांदा मदतीला येईल असा विश्वास त्यांना वाटला होता आणि त्याच आशेवर ते होते. प्रत्यक्षात बाजारात गेल्यावर त्यांना हा भलताच मोठा धक्का बसला आणि रुपया पाहून त्यांच्या हातापायातील अवसान गळून गेले. 


जवळपास ७० किलोमीटर अंतराचा प्रवास करून ते अहमदनगर येथील बाजरा समितीत १७ गोणी कांदा घेवून गेले. संतोष सूर्यवंशी यांच्या आडत दुकानावर त्यांनी आपला कांदा दिला.  १७ गोण्यांची पट्टी त्यांच्या हातात आली आणि खर्च जाऊन एक रुपया त्यांना मिळाला. बळीराजाची यापेक्षा अधिक वाईट आणि क्रूर थट्टा दुसरी काय असू शकते ? रुपयाची पट्टी पाहून हतबल झालेले नामदेव केवळ पट्टीवरील रुपयाच्या आकड्याकडे पहात राहिले आणि धाय मोकलून रडू लागले. कांदा पिकवताना मजुरीने लावलेल्या महिलांचे दहा हजार रुपये देणे अजून बाकी होते, शिवाय कुटुंबाचा आणि मुलांच्या शाळेचा खर्च त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता. धाय मोकलून नामदेव रडत होते आणि म्हणत होते, "मायबाप सरकार, आता कसा जगू ? मुलांच्या शाळेचा खर्च कसा करू? त्यांची फी कशी भरू आणि कुटुंबाचा खर्च कसा भागवू ? मायबाप सरकार, आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं ?"  


नामदेव लटपटे यांचे हे उदाहरण केवळ प्रातिनिधिक स्वरुपात आहे. बावी गावातील ७० टक्के शेतकरी हे कांदा लागवड करतात आणि या सर्वांची अवस्था एकसारखीच आहे. सरकार मात्र मोठमोठ्या घोषणा करीत आहे पण बळीराजाची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. (The price of onion collapsed in the market, the onion farmer  crying) अतिवृष्टीच्या तडाख्यातून सावरण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे आणि शासकीय धोरण त्यांच्या पायातील बळ काढून घेत आहे. बाजारात गेल्यावर शेतीमालाला मातीचा भाव देखील मिळत नाही त्यामुळे बळीराजाची अवस्था अत्यंत कठीण होत चालली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !