शोध न्यूज : खेळता खेळता तीन वर्षाची चिमुकली पाण्याच्या लहान हौदात पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना पंढरपूर तालुक्यात घडली असून या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
डोळ्यात तेल घालून लहान मुलांची काळजी घ्यावी लागते आणि सतत बालकांवर नजर असावी लागते हे या अत्यंत दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. लहान मुले खेळता खेळता काही वस्तू गिळतात आणि नंतर मात्र याचा परिणाम घातक होतो. अशा घटना नेहमी घडत असतानाच पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे एक अत्यंत वाईट घटना घडली. पाणी खेळत खेळत राजश्री मोहन घाडगे ही तीन वर्षे वयाची चिमुकली पाण्याच्या एका छोट्या हौदात पडली आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. पाण्याच्या या हौदात पडून तिचा मृत्यू झाला आणि कुटुंबाला एक असह्य धक्का बसला. शेतकरी मोहन घाडगे यांच्याकडे जनावरे असल्याने त्यांना पाणी पिण्यासाठी सिमेंटचे छोटे कुंड ठेवण्यात आले आहेत. (A child fell into a well while playing and died, Pandharpur taluka) हे पाण्याचे कुंड अर्थात छोटे हौद त्यांनी घराच्या अंगणातच ठेवलेले आहेत. या हौदातच ही दुर्घटना घडली आणि देगाव परिसरच नव्हे तर पंढरपूर तालुक्याला मोठा धक्का बसला.
चिमुकल्या राजश्रीला घरी ठेवून मोहन घाडगे हे पत्नीला घेवून दवाखान्यासाठी पंढरपूर येथे गेले होते, घरात अन्य सदस्य असल्यामुळे त्यांच्याजवळ राजश्रीला ठेवण्यात आले होते. राजश्री अंगणात खेळत होती तर घरातील अन्य सदस्य हे नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होते. हातात बाटली घेवून राजश्री हौदातील पाण्याशी खेळत होती आणि हा खेळ खेळता खेळता तिच्या हातातील बाटली त्या हौदात पडली त्यामुळे ती बाटली काढण्याचा प्रयत्न ही चिमुकली करू लागली. बाटली तिला बाहेर काढता आलीच नाही पण राजश्री मात्र या हौदातील पाण्यात पडली. दरम्यान काही वेळेने अन्य काही मुलांनी राजश्री पाण्यात पडली असल्याचे पाहिले आणि त्यांनी घरातील लोकांना सांगितले. समोरचे चित्र पाहून घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने तिला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेले. राजश्रीच्या नाकातून आणि तोंडातून पाणी गेले होते त्यामुळे ती गुदमरली होती. उपचार करण्यापूर्वीच गुदमरून तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे. खेळत असलेल्या लहान मुलावरील नजर थोडीशी जरी इकडे तिकडे गेली तर अशा घटना घडू शकतात म्हणून पालकांनी अंत्यंत बारकाईने बालकांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे. या घटनेने अनेकांचे काळीज पिळवटून गेले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !