शोध न्यूज : ढाब्यावर बसून दारू पिणे आणि अवैधरीत्या दारूची विक्री करणे पुन्हा एकदा महागात पडले असून पाच तळीरामाना प्रत्येकी पाच हजार आणि ढाबाचालकास २५ हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.
रस्त्यारस्त्यावरील ढाबे हे मद्यप्राशन आणि बेकायदा विक्रीची प्रमुख केंद्रे बनलेली आहेत. ढाब्याढाब्यावर अवैधरीत्या दारूची खुलेपणाने विक्री होते आणि अशा ठिकाणी बसून मोठ्या संख्येने मद्यप्राशन केले जाते. सगळीकडेच अत्यंत उघडपणे हा प्रकार बिनधास्त सुरु असून त्यांच्यावर कारवाई देखील होत नसते. अशा ठिकाणी मद्यविक्री अथवा मद्यप्राशन हे कायद्याने गैर असले तरी याची जाणीवही कुणाला होत नाही एवढ्या खुलेपणे हा सर्व प्रकार सुरु असतो. शासनानाचा महसूल बुडवत अत्यंत उघडपणे दिवसरात्र हा खेळ सुरु असतो. कारवाई होत नसल्यामुळे कायद्याची जाणीवही कुणाला होत नसून परवानगी असल्याप्रमाणे ढाबाचालक मद्यविक्री करतात आणि ग्राहक देखील 'निवांत' बसून मजा घेत असतात. गेल्या काही दिवसांपासून मात्र राज्यात याकडे लक्ष दिले जाऊ लागले असून धडाधड कारवाई केली जात आहेत त्यामुळे ढाबे चालकाचे धाबे दणाणले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात देखील अशा प्रकारच्या कारवाया सुरु झाल्या असून नुकताच काही जणांना न्यायालयाने मोठा दंड सुनावला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सोलापूर -हैद्राबाद रस्त्यावरील हॉटेल मिलन येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या मद्यविक्री आणि मद्यप्राशन करणारी मंडळी सापडली. या ठिकाणी बेकायदेशीररित्या मद्य विकले जात होते तर पाच जण या हॉटेलमध्ये बसून विनापरवाना मद्यप्राशन करीत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला आढळून आले. या पथकाने पाच ग्राहकांसह हॉटेल चालकावर कारवाई करीत ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि अटकेची कारवाई केली. दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
हॉटेल चालक आणि पाच ग्राहक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यवाही अत्यंत जलद गतीने झाली. अवघ्या एक दिवसात न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आणि एक दिवसातच दारूबंदी न्यायालयाने सुनावणी घेत निकाल दिला. अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या ढाबाचालकास २५ हजाराचा दंड तर हॉटेलमध्ये बसून मद्यप्राशन करीत असलेल्या पाच जणांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या या कारवाईमुळे आणि न्यायालयाने दंड केल्यामुळे अवैधरित्या मद्य विकणारे हॉटेल चालक हादरले असून ढाब्यावर बसून मद्यप्राशन करणाऱ्यांनाही हा मोठा इशारा मिळाला आहे. (Without license lequor punishment of fine Hoteliers customers) अशा कारवाया होत असतानाही अजूनही अनेक ढाब्यांवर अवैध प्रकार अजूनही खुलेआम सुरु आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कधी कारवाई होतेय याकडेही लक्ष लागलेले आहे.
बार्शीतही 'दणका' !
काही दिवसांपूर्वी बार्शी येथे अशा हॉटेल चालक आणि ग्राहकांना मोठा दणका बसला आहे. बार्शी शहर परिसरातील 'हॉटेल सांज' आणि 'हॉटेल राजमुद्रा' येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला तेंव्हा तेथे दारू विकली जात असल्याचे आणि तेथे बसून पिण्यात येत असल्याचे दिसून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत चालकासह ग्राहाकानाही कायद्याचा फटका दिला. या दोन्ही हॉटेलवर कारवाई करीत हॉटेलच्या चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाच पण या ठिकाणी अवैधरीत्या दारू पीत बसलेल्या सहा जणांविरुद्ध देखील कारवाई करण्यात आली. हॉटेल चालक आणि मद्यपान करणाऱ्या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तेथून २ हजार २८० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या, ग्लास आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. केवळ एक दिवसात त्यांच्या विरोधात आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आणि न्यायालयाने देखील तत्काळ निकाल देत आरोपींना दंड ठोठावला होता.
आपले कुणीच काही करू शकत नाही असा गैसमज काही हॉटेल चालकांचा असतो परंतु येथे मात्र कायदा काय असतो याची अनुभूती या हॉटेल चालकांना आली आहे. न्यायालयाने दोन्ही हॉटेल चालकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या हॉटेलमध्ये बसून विनापरवाना मद्यप्राशन करीत असलेल्या सहा ग्राहकांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती.
परवाना पाहिजेच !
मद्यपान करणारे तसेच वाईन शॉप मधून मद्य खरेदी करणारे यांच्याकडे परवाना असणे आवश्यकच आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हा परवाना केवळ शंभर रुपयात एक वर्षांसाठी मिळतो तर एक हजार रुपयात लाईफ टाईम परवाना घेता येतो. दुकानातून दारू खरेदी करताना असा परवाना आवश्यक आहेच अन्यथा कारवाई होऊ शकते. परमीट रुम शिवाय अन्य ठिकाणी बसून दारू पिणे हा गुन्हा तर आहेच पण परवाना असणे देखील तितकेच आवश्यक आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !