शोध न्यूज : लाचखोर तलाठ्याला न्यायालयाने दंडासह दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली असून यामुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रोज अनेक लाचखोरांच्या मुसक्या आवळत आहे पण शासकीय विभागात नवनवीन लाचखोरीची प्रकरणे समोर येतच असतात. शासनाकडून भलेमोठे पगार दर महिन्याला मिळत असतानाही शासकीय सेवक लाचेच्या मलिद्याला चटावलेले असल्याचे जागोजागी अनुभवला येत असते. रोज यांच्या नोकरी संकटात येताना दिसतात तरीही लाचेचा मोह आवरत नाही. साहेबापासून शिपायापर्यंत लाचखोरीचा सुळसूळाट असून महसूल आणि पोलीस विभागातील अशा घटना सतत समोर येतात. सर्वच शासकीय विभागात हे प्रकार सुरु असतात परंतु महसूल विभाग हा मात्र पुढेच असतो. तहसीलदार, तलाठी, मंडलाधिकारी असे अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहात सापडतात आणि यातून सुटण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधल्या जातात. लाच घेताना पकडले तरी पुढे काही होत नाही अशा भ्रमात अनेकजण असतात परंतु सोलापूर जिल्ह्यातील एका तलाठ्याला तब्बल पाच वर्षाची शिक्षा लाचखोरीच्या प्रकरणात सुनावण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
खरेदी केलेल्या शेतीची सात बारा उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच या तलाठ्याला भलतीच महागात पडली असून न्यायालयाने दोन हजार रुपये दंडासह तब्बल पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सोलापूर जिल्ह्यातील लिंबी चिंचोळी येथील तत्कालीन तलाठी रामकिसन पंडितराव किन्हाळकर याला सोलापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनवली आहे. तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमीनीच्या सात बारा उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी तलाठी किन्हाळकर याची भेट घेतली होती पण या कामासाठी तलाठ्याने तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. लाच देणे मान्य नसल्यामुळे तक्रारदारांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि तलाठ्याच्या विरोधात तक्रार दिली. या विभागाने सापळा लावून त्याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. याचा गुन्हा सोलापूर सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
सन २०१७ मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करून तलाठ्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली आणि या सुनावणीत तलाठी रामकिसन किन्हाळकर हा दोषी असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने या तलाठ्यास दहा वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. (Briber Talathi sentenced to hard labor for ten years) कलम ७ नुसार पाच वर्षे शिक्षा आणि दोन हजार दंड आणि कलम १३ नुसार पाच वर्षे शिक्षा, दोन हजार दंड अशी दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली असून या दोन्ही शिक्षा मात्र एकत्रित भोगायच्या आहेत. या तलाठ्याला लाचखोरीत शिक्षा झाल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून अन्य लाचाखोरांचे धाबे दणाणून गेले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !