शोध न्यूज : कांद्याच्या दराने कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात सद्या पाणी आणले असतानाच एका शेतकऱ्याने पिकवलेला कांदा (big size onions) हा मोठ्या चर्चेचा ठरला असून त्यांच्या शेतात एकेक कांदा पाउण किलो वजनाचा आहे.
एकीकडे शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी कासावीस झाला आहे. वर्षानुवर्षे आक्रोश करीत असला तरी सरकारच्या कानावर हा आक्रोश पोहोचत नाही. घाम गाळून, खर्च करून पिकवलेला कांदा शिवारातच फेकून देण्याची वेळ बळीराजावर आलेली आहे. पिकवलेला कांदा घेवून बाजारात गेले तर दोन रुपयांचा चेक हातात येतो आहे, शंभर किलो वांग्याचे ६६ रुपये घेवून शेतकरी राजाला घरी परतावे लागत आहे. निराशेत शेतकरी आपणच कष्टाने जोपासलेले पिक उखडून फेकत आहे. अशी सगळी निराशा दाटलेली असताना शेतकरी एकेक प्रयोग करीत कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी धडपड करीत आहे. कृषी क्षेत्रातील नकारात्मक घडामोडी सतत समोर येत असताना एका शेतकऱ्याच्या शेतात मात्र असे कांदे पिकले आहेत की ते पाहण्यासाठीही लोक गर्दी करू लागले आहे. शेतात पिकलेला एकेक कांदा पाऊण किलोचा असल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.
उत्पादनाच्या गुणवत्तेवर बाजारात दर मिळत असतो त्यामुळे लहान कांद्याला फारशी किंमत मिळत नाही. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्याच्या शेतात तब्बल पाऊण किलो वजनाचे कांदे पिकले आणि हे कांदे पाहण्यासाठीही परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या कुतूहलाने गर्दी केली. संपूर्ण गाव त्यांच्या शेतात गोळा झाले आणि हा मोठ्या वजनाचा कांदा डोळा भरून पहात राहिले. साधारणपणे ५० ते १०० ग्रॅम वजनाचा कांदा आपण पाहिलेला असतो पण शिरगावे यांच्या शेतातील कांदा चक्क ७५० ते ८०० ग्रॅम वजनाचा आहे. जगावेगळे काही पहिले की चमत्कार वाटू लागतो आणि हा कांदा पाहून देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वजनाचे सारे रेकॉर्ड या कांद्याने मागे टाकले आहेत त्यामुळेच या कांद्याची मोठी चर्चा सरू आहे .
हनुमंत शिरगावे यांनी आपल्या शेतात आंतरपीक म्हणून कांदा लागवड केली होती त्यामुळे ऊसासोबत कांद्यालाही चांगले आणि पुरेसे खतपाणी मिळून गेले. प्रारंभी या शेतात दहा ते बारा कांदे मोठ्या आकाराचे आणि अधिक वजनाचे निघाले त्यामुळे शिरगावे आश्चर्यचकित झाले. नंतर मात्र असेच मोठ्या आकाराचे कांदे काळ्या मातीतून मिळू लागले. कौतुकाने शिरगावे यांनी या कांद्याचे वजन करून पहिले असता एकेक कांदा ७५० ते ८०० ग्रॅम वजनाचा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कांद्याची माहिती परिसरात पसरली आणि आजूबाजूचे शेतकरी हा कांदा पाहण्यासाठी शिरगावे यांच्या शेताकडे येत राहिले. केवळ कांदा पाहण्यासाठी संपूर्ण गाव शिरगावे यांच्या शेतात लोटला आणि मोठ्या वजनाचा कांदा पाहून जो तो आश्चर्यचकित होऊ लागला आहे. कांद्याची गुणवत्ता वाढावी म्हणून शेतकरी प्रयत्न करीत असतो. येथे मात्र योगायोगाने हा पाऊण किलोचा कांदा पिकला आहे.
सदर शेतकऱ्याने हा काही वेगळा प्रयोग केलेला नाही तर त्यांनी नेहमीची रोपे बाजारातून आणून लावणी केली होती. ऊसात कांदा लागवड केली असल्यामुळे उसासोबत दोन वेळा कांद्याचीही आळवणी झाली होती तसेच ह्युमिक, फुलाविक, सिव्हीड याची दोनदा फवारणी करण्यात आली होती. (Amazing! Farmers rush to see record weight of onions) शिरगावे यांनी ऊसासाठी प्रयोग केला आणि तो कांद्याला लागू पडला. एकेक कांदा पाउण किलो वजनाचा निघू लागला आणि एक कौतुकाचा विषय बनून गेला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिरगावे यांचा सत्कार देखील केला आणि पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. बाजारात निराशा असली तरी या कांद्याने यावेळी डोळ्यात पाणी आणले नाही तर चेहऱ्यावर हास्य मात्र फुलवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !