BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ फेब्रु, २०२३

शंभर किलो वांग्याचे मिळाले केवळ ६६ रुपये !

 


शोध न्यूज : शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी परेशान झालेले असतानाच आता पुन्हा एक चिंताजनक बाब समोर आली असून एका शेतकऱ्याच्या १०० किलो वांग्याला बाजारात केवळ ६६ रुपये मिळाले आहेत. वैतागलेल्या या शेतकऱ्याने आपली वांग्याची संपूर्ण बागच उखडून फेकून दिली आहे.

 

सद्या कांद्याचा हंगाम सुरु असून सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कांद्याच्या विक्रीतील केवळ २ रुपयांचा धनादेश देण्यात आला. तो देखील पंधरा दिवसांनी वटला आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मालाची बाजारात काय किंमत उरली आहे याचे बोलके उदाहरण समोर आले. हा विषय राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला आणि पवार यांनी शासनाचे वाभाडे काढले. पाचशे किलो कांदा विकला आणि त्यांना एक रुपये दर मिळाला. उचल आणि इतर खर्च वगळून मार्केट यार्डातून त्यांना दोन रुपयांचा चेक देण्यात आला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला तसेच संबंधितावर पंधरा दिवस परवाना रद्दची कारवाई देखील करण्यात आली. अशा प्रकारे शेतकऱ्याचा कष्टाची थट्टा सुरु असताना पुरंदर पुन्हा अशाच प्रकारचा अनुभव आला आहे. 


पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावाच्या नाना चिवटे या एका शेतकऱ्याला शंभर किलो वांग्याचे केवळ ६६ रुपये मिळाले आहेत. बाजारात नेण्याचा खर्चही निघाला नसून कांद्याचे बियाणे आणि पिक जोपासण्यासाठी झालेला सगळा खर्च मातीत गेल्याने शेतकरी निराश झाला. शंभर किलो वांग्याचे ६६ रुपये हातात आल्याचे पाहून आलेल्या नैराश्यातून त्याने शेतातील सगळी वांगी चक्क उपटून फेकून दिली आहेत. पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये चिवटे यांनी आपल्या शेतातील शंभर किलो वांगी विक्रीसाठी नेली होती. सदर मार्केटमध्ये ती विकलीही परंतु त्यांना केवळ ६६ रुपये मिळाले. ही रक्कम पाहून ते संतापले आणि निराशही झाले. ११ गुंठे क्षेत्रात त्यांनी कांद्याचे पिक घेतले होते ते सगळे उपटून टाकले. बियाणापासून पिक अंतिम टप्प्यात येईपर्यंत मोठा खर्च करावा लागला होता पण बाजारात नसलेल्या किमतीमुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. 


शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून आक्रोश करीत आहे पण त्याचा आवाज शासनाच्या कानापर्यंत जात नाही. शेतकरी मर मर मरतो, पिक जोपासतो आणि अखेरीस त्याच्या हाती काहीच लागत नाही. शेतकरी आत्महत्या होत आहेत त्यावर अनेकजण मोठे उपदेश देतात, आश्वासनेही देतात परंतु शेतकऱ्याने असे चुकीचे पाऊल उचलूच नये अशी परिस्थिती मात्र तयार होत नाही. (As there was no price, the farmer destroyed the eggplant farm) नाना चिवटे यांना कांदा जोपासण्यात ५६ हजार रुपयांचा खर्च आला होता पण त्यांच्या हातात ५ हजाराचीही रक्कम पडली नाही. राजकारणात केवळ सत्ताकारण आणि एकमेकांची उणीदुणी काढण्याची स्पर्धा लागली आहे पण इकडे शेतकरी घाम गळून निराशेच्या गर्तेत सापडला आहे. त्याकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !