शोध न्यूज : शेतातील विद्युत रोहित्र खराब झाल्यास लवकर बदलून मिळत नसल्याची शेतकऱ्यांची जुनीच तक्रार आहे परंतु यापुढे दोन ते तीन दिवसांत रोहित्र बदलून दिले जाणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
शेतातील विद्युत रोहित्र जळणे अथवा नादुरुस्त होणे ही शेतकरी बांधवांची मोठी आणि प्रमुख डोकेदुखी आहे. एक तर वेळेत आणि पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा होत नाही, विद्युत पुरवठा सुरळीत असला तरी विद्युत रोहित्र अर्थात डी पी जळणे अथवा नादुरुस्त होणे अशा अडचणी येतात. डी पी जळण्याचे प्रमुख कारण अतिरिक्त दाब हेच असते आणि अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या आकडे टाकून वीज घेतली गेल्याने महावितरणचे नियोजन फसते आणि त्यामुळे अतिरिक्त दाब वाढून रोहित्र जळते. अर्थात त्यानंतर याचा फटका शेतकरी बांधवानाच बसत असतो. रोहित्र जळले किंवा नादुरुस्त झाले तर शेतीला पाणी देणे बंद पडते. संबंधित डी पी वरील विद्युत पुरवठा खंडित होतो आणि मग शेतकरी बांधवांची धावपळ सुरु होते.
डी पी नादुरुस्त झाला की शेतकरी महावितरणकडे धाव घेतात परंतु महावितरणकडून डी पी दुरुस्त करून अथवा बदलून देण्याच्या प्रीक्रियेत विलंब होत असतो. दरम्यान शेतातील उभी पिके धोक्यात येतात म्हणून शेतकरी चिंतेत सापडतो. कित्येक दिवस डी पी ची व्यवस्था न झाल्याने मोठा फटका सहन करावा लागतो. यापुढे मात्र असा प्रकार होणार नसल्याचे दिसत असून दोन ते तीन दिवसात डी पी देण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. अर्थात शेतकऱ्यासाठी ही मोठी आणि दिलासादायक बाब आहे. रब्बी हंगामाच्या काळात विजेच्या मागणीत वाढ होते आणि विद्युत वितरण यंत्रणेवर येणारा ताण वाढत असतो. यात अतिभार होऊन डी पी जळण्याचे प्रकार घडत असतात. गेल्या ७० दिवसात सोलापूर जिल्ह्यात ३ हजार १७० डी पी जळले गेले असून त्यापैकी ३ हजार २४० डीपी तातडीने बदलण्यात आले असून ३० डीपी बदलणे अजून प्रलंबित आहे.
नादुरुस्त झालेले डीपी तत्काळ बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने महावितरणच्या नियंत्रण कक्षास फोन केल्यास केवळ दोन ते तीन दिवसात रोहित्र बसविण्याचे काम केले जाईल अशी माहिती आता महावितरणने दिली आहे. वर्षभरात सरासरी ७.४४ टक्के रोहित्रे नादुरुस्त होत असतात. अनधिकृत वीज वापर, कॅपॅसिटर न वापरणे ही रोहित्रे जळण्याची मुख्य करणे असून रब्बी हंगामात रोहित्रे जळण्याचे प्रमाण अधिक असते. रोहित्र नादुरुस्त होताच महावितरणच्या नियंत्रण कक्षात फोन केल्यास दोन तीन दिवसात रोहित्राची व्यवस्था केली जाणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी ९०२९१४०४५५ हा मोबाईल क्रमांक देण्यात आला असून या क्रमांकावर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रोहित्र नादुरुस्त झाल्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्युत रोहित्र नादुरुस्त होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यासाठी अनधिकृत वीज वापर टाळण्याची आवश्यकता असून रोहित्र व कृषिपंप वाचवायचे असतील तर कॅपॅसिटरचा वापर करणे हा किफायतशीर उपाय आहे. (Henceforth farmers will get electricity DP in two days) कॅपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषिपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. यामुळे महावितरण आणि शेतकरी या दोन्ही घटकांचा फायदाच होत असतो त्यामुळे याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !