BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ फेब्रु, २०२३

एका ठिणगीने लागलेल्या आगीत दोन वृद्धांचा मृत्यू !

 




शोध न्यूज : बार्शी तालुक्यातून अत्यंत दुर्दैवी बातमी आली असून झोपडीला लागलेल्या आगीत वृद्ध दांपत्यांचा आगीत जळून मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायी घटना आज घडली आहे. 


बार्शी तालुक्यातील बेकायदा फटाका कारखान्यात स्फोट होऊन कामगार महिलांचे जीव गेल्याची दुर्घटना नुकतीच घडली असतांना आता बार्शी तालुक्यातच आणखी एक अत्यंत वाईट घटना घडली आहे आणि यात दोन वृद्धांचा प्राण गेला आहे. चुलीतील ठिणगी उडाल्याने झोपडी जळाली आणि या झोपडीस लागलेल्या आगीत वृद्ध पती पत्नी जळून मृत्युमुखी पडले आहेत. बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथे ९५ वर्षाचे भीमराव काशीराम पवार आणि ९० वर्षे वयाच्या त्यांच्या पत्नी कमल भीमराव पवार हे एका झोपडीत राहत होते. आज सकाळी स्नानासाठी त्यांनी चुलीवर पाणी तापविण्यासाठी ठेवले होते. कमल पवार यांनी चुलीवर पाणी ठेवले आणि त्याचवेळी त्यांची म्हैस सुटली त्यामुळे तिला बांधण्यासाठी त्यांनी नातवाला उठवले. या दरम्यान झोपडीला आग लागली. दोघांनी मिळून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला पण आग अधिकच भडकत गेली. ९५ वर्षे वयाचे भीमराव पवार हे आतल्या बाजूला झोपलेले होते आणि बाहेरून आगीने उग्र स्वरूप धारण केले होते. वृद्ध पतीला आगीतून वाचविण्यासाठी कमल पवार या झोपडीत धावल्या पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.  आगीने पूर्ण वेढले आणि भीमराव यास वाचवता आलेच नाही पण कमल या देखील या आगीत जळून मृत्युमुखी पडल्या. 


भल्या सकाळी ही घटना घडली असून चुलीतून उडालेल्या एका ठिणगीने वृद्ध दांपत्यांचा जीव घेतला आहे. यादुर्घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. (old husband and wife die in a fire started by a spark)पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. सकाळी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !