BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ फेब्रु, २०२३

लग्न जुळत नाही म्हणून आणखी एका तरुणाची आत्महत्या !

 





शोध न्यूज : वय झाले तरी लग्न जुळत नाही म्हणून आणखी एका तरुणाने आत्महत्या केली असून गेल्या काही वर्षांपासून लग्न हीच मोठी समस्या बनली असल्याचे दिसून येऊ लागले आहे.


प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न ही एक मोठी आणि आवश्यक बाब असते. शिक्षण पूर्ण करून नोकरी अथवा उद्योग करून काही कमवायला सुरुवात केली की लग्नाचा महत्वाचा आणि आवश्यक टप्पा पार करायचा असतो पण काळानुरूप समस्या बदलत असतात त्यातील लग्नाची समस्या खूपच मोठी आणि बिकट होताना दिसत आहे. तरुण जोमाने शिक्षण पूर्ण करतो पण बेकारीच्या आक्रमणामुळे त्याला नोकरी मिळत नाही. एकीकडे मुलींची संख्या कमी होत असल्याने लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत आहे त्यात शिकलेल्या मुली शेतकरी तरुणासोबत विवाह करण्यास राजी नाहीत. प्रत्येक मुलीला नोकरी करणारा आणि शहरात राहणारा मुलगा हवा असतो पण प्रत्येक  मुलाला नोकरी मिळत नाही. अनेक तरुण मुले चांगली शेती करतात पण तरीही मुलींकडून त्याला नकार दिला जातो. एकीकडे नोकरी मिळत नाही, त्याच्याजवळ शहरात फ्लॅट नसतो त्यामुळे मुलीच्या अपेक्षा तो पूर्ण करू शकत नाही. या कसरतीतच वय पुढे पुढे जात असते आणि अखेर निराशा येऊन टोकाचे पाऊल उचलले जाते. 


गेल्या काही काळात विवाह जुळत नसल्याच्या निराशेतून होत असलेल्या तरुणांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत. अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून अशीच एक घटना समोर आली होती. त्यानंतरही राज्यात काही अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून आता पुन्हा एका तरुणाने बीड जिल्ह्यातील एका कालव्यात आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मूळ नेकनूर येथील असलेल्या केशव काशीद याने पाली धरणाजवळच्या तळ्यात आत्महत्या केली असल्याची बाब उघडकीस आली आहे. पाली धरणावर तीन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीचे कपडे सापडले होते. यात असलेल्या पैशाच्या पाकिटात केवळ ७५ रुपये आणि आधारकार्ड आढळून आले होते. आधारकार्ड असल्याने ओळख पटविण्यात अडचण आली नाही, नातेवाईकांशी संपर्क साधून या कपड्यांची ओळख पटली परंतु तरुणाचा शोध मात्र लागलेला नव्हता. सदर तरुण हा बीड येथे आपल्या मामाकडे राहत होता आणि एका गॅरेजमध्ये काम करीत होता. मामा आपल्या कुटुंबासह परगावी गेल्यानंतर तीन दिवसांपासून हा तरुणही बेपत्ता होता. याबाबत सविस्तर माहिती पोलिसांच्या हाती लागली होती परंतु तरुणाचा काही पत्ता नव्हता. 


मिळालेल्या कपड्याच्या आधारावरून पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने तळ्यात त्याचा शोध सुरु केला आणि अपेक्षेप्रमाणे या तरुणाचा मृतदेह तळ्याच्या पाण्यात आढळून आला. केशव हा सतत तणावात होता, वय निघून चालले होते परंतु त्याचे लग्न जुळत नव्हते म्हणून तो प्रचंड निराश होता (Another youth commits suicide due to mismatched marriage)  याच निराशेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे तपासात समोर आले आणि परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली. लग्न जुळणे ही किती मोठी समस्या डोके वर काढू लागली असल्याचे आणखी एकदा या घटनेने दाखवून दिले आहे. तरुण मुलगा अशा पद्धतीने गेल्याने त्याच्या कुटुंबावर तर मोठा आघात झाला आहे.


  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !