शोध न्यूज : सरकारी काम उरकून आपल्या घराकडे निघालेल्या ग्रामसेविकेला कंटेनरने चिरडल्यामुळे झालेल्या अत्यंत भयानक अपघातात सांगोला तालुक्यातील ग्रामसेविका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अवघा सांगोला तालुका हळहळला आहे.
सांगोला तालुक्यातील कडलास येथील आदर्श ग्रामसेविका म्हणून पुरस्कार मिळालेल्या स्वप्नाली सोनलकर या ३५ वर्षे वयाच्या ग्रामसेविका काल सायंकाळी आपले शासकीय कामकाज करून स्कुटीवरून घराकडे निघालेल्या होत्या. यावेळी रस्त्यावर एका कंटेनरने त्यांना चिरडले. कंटेनरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे नुकताच एक भीषण अपघात झाला होता आणि या अपघातात आठ वारकरी मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेची जखम ताजी असताना एका आदर्श ग्रामसेविकेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सांगोला तालुका पुन्हा एकदा हळहळला आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्वप्नाली सुनील सोनलकर या सांगोला तालुक्यातील कडलास येथील असून सांगोला तालुक्यातच बुरंगेवाडी येथे ग्रामसेविका म्हणून कार्यरत होत्या. सांगोला तालुक्यातील मेडशिंगी हे त्यांचे मूळ गाव असून कडलास (वाघमोडे वस्ती) हे त्यांचे सासर आहे. शासकीय काम करण्यासाठी त्या पंचायत समिती सांगोला येथे गेलेल्या होत्या. दिवसभर पंचायत समितीत आपले शासकीय काम त्यांनी केले आणि हे काम उरकून सायंकाळी त्या परत आपल्या घराकडे निघालेल्या होत्या. आपल्या स्कुटीवरून कडलास गावाच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका कंटेनरने त्यांना चिरडले आणि अपघात झाला. कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने सोनलकर या खाली पडल्या आणि कंटेनरचे मागचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले त्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला.
सदर अपघात झाल्यानंतर कंटेनरचालकाने तेथे न थांबता तो तसाच कंटेनर घेवून पुढे निघून गेला. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांनी स्वाधीन केले. मोहोळ तालुक्यातील तांबोळे येथील हा कंटेनर चालक असून प्रवीण परमेश्वर पवार असे या चालकाचे नाव आहे. सांगोला पोलिसात या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. (Horrible accidental death of village servant Sangola Taluka)या घटनेचे वृत्त समजताच नागरिकांनी आणि पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांनी गर्दी केली होती. एका आदर्श ग्रामसेविकेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली असून अवघा सांगोला तालुका हळहळला आहे.
(Sangola taluka has been shaken by the unfortunate death of a woman village worker from Sangola taluka in a very horrific accident where a village servant was crushed by a container after finishing her government work.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !