शोध न्यूज : अतिक्रमण काढून घ्या नाहीतर कारवाई करू असा इशारा सरकारी यंत्रणेने देणे हे काही नवे नाही किंवा यात काही विशेषही नाही. भारतीय रेल्वेने मात्र काहीतरी विशेष असेच करून दाखवले असून रेल्वेने चक्क श्रीराम भक्त हुनुमानालाच अशा प्रकारची नोटीस बजावली आहे.
सरकारी यंत्रणा कधी काय करील हे कुणालाच सांगता येत नाही. विजेचे कनेक्शन न घेता कुणाच्या तरी घरी महावितरणचे बिल येवून पडते. झोपडीत एखादाच बल्ब लागलेला असला तरी त्यांना हजारो आणि लाखो रुपयांचे बिल भर म्हणून सांगितले जाते. बँकेतील कर्ज घेतले नसतानाही कर्ज भरा अन्यथा जप्तीची कारवाई केली जाईल अशी नोटीस बँकेकडून येते असे अनेक प्रकार अधूनमधून घडत असतात. संबंधिताना याचा मनस्ताप होतो पण इतरांची मात्र यामुळे करमणूक होत असते. सरकारी यंत्रणेत असलेल्या माणसांकडून माणसांवर अशा प्रकारच्या चुकीच्या कारवाया होत असतात पण आता मात्र भारतीय रेल्वेने एक वेगळीच कमाल केली आहे आणि यामुळे भलतीच धमाल आलेली पाहायला मिळत आहे. भारतीय रेल्वे प्रशासन अजूनही ब्रिटीशांच्या स्टाईलमध्ये असल्याचे अनेकदा दिसते. कायदा म्हणजे कायदा असा शिरस्ताच रेल्वे प्रशासनात पाहायला मिळतो पण त्याचा इतका अतिरेक झाला आहे की रेल्वेने थेट एका हनुमानालाच नोटीस धाडली आहे.
ग्वाल्हेर -श्वापूर रेल्वे मार्गाचे रुंदीकरणाचे काम सद्या सुरु आहे त्यामुळे रेल्वेच्या हद्दीत असलेल्या जागेत ज्यांनी कुणी अतिक्रमण केले आहे त्यांना नोटीसा पाठवून ते काढून घेण्याचे आदेश देत कारवाई करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. लोकांना नोटीसा देणे इथपर्यंत ठीक आहे पण रेल्वेने चक्क मंदिरातील एका बजरंगबलीला देखील अशा प्रकारची नोटीस बजावली आहे. मोरेना जिल्ह्यातील सबलगढ तालुक्यातील रेल्वेमार्ग रुंदीकरणाच्या कामात हनुमान मंदिर हे अतिक्रमित ठरविण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हे मंदिर आहे ती जागा रेल्वेची असल्याचे सांगण्यात आले असून त्यामुळे अशी नोटीस देण्यात आली आहे पण ती नोटीस थेट प्रत्यक्ष बजरंगबली यांना बजावण्यात आली आहे. बजरंगबली यांच्याच नावाने ही नोटीस लिहिण्यात आली असून ही नोटीस मिळाल्याच्या सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घेण्याची ताकीद देण्यात आली आहे. हे अतिक्रमण काढून न घेतल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही या नोटीसीत देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नोटिशीवर अधिकाऱ्याची सही असून त्याच्या प्रती सहाय्यक विभागीय अभियंता ग्वाल्हेर आणि स्टेशन प्रभारी यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.
'तुम्ही रेल्वेच्या जागेत मंदिर बांधून अतिक्रमण केले आहे' असा आरोप श्रीराम भक्त हनुमानावर करण्यात आला असून हनुमानाच्या नावानेच ही नोटीस जारी केली गेली आहे. विशेष म्हणजे अशा नोटीसीवर वरिष्ठ अधिकारी देखील सही करून बाजूला झाले आहेत. देवाला नोटीस देणे किंवा देवाची न्यायालयात साक्ष काढणे असे प्रकार हिंदी चित्रपटातून पाहायला मिळाले आहेत. (Action notice from Indian Railways directly to Bajrangbali!) भारतीय रेल्वेने मात्र थेट हनुमानाला कारवाईची नोटीस बजावली आहे. ही नोटीस समाजमाध्यमांवर देशभर व्हायरल झाली असून अनेकांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !