BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ जाने, २०२३

फुटलेली शिवसेना पुन्हा येणार एकत्र ? राजकीय वातावरण ढवळले !





शोध न्यूज : दोन्ही शिवसेनेचे भवितव्य न्यायालयात जे व्हायचं ते होईल परंतु त्याआधीच फुटलेल्या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचे संकेत मिळू लागले असून शिंदे गटाचे मंत्री आणि प्रवक्ते केसरकर यांनी केलेल्या सूचक विधानांमुळे राजकरण पुन्हा ढवळू लागले आहे.


एकसंध शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फुटून गेले आणि भाजपशी संधान साधत त्यांनी राज्यात सरकार स्थापन केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी थेट शिवसेना पक्षावरच आपला हक्क सांगितला आहे आणि पक्षाचे चिन्ह देखील गोठवले गेले आहे. चाळीस आमदारांनी बंद केले तेंव्हाचे वातावरण वेगळे होते परंतु काही दिवसातच शिंदे गटात अंतर्गत वाद उफाळून येऊ लागला आहे. शिंदे गटातील चार पाच मंत्री कथित घोटाळ्यात अडकले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील अशा घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. विधानसभेतील वातावरण तापत असतानाच ही सगळी प्रकरणे भाजपनेच काढली आहेत आणि शिंदे गटाला अडचणीत आणणे सुरु झाले आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यातच शिंदे गटाचे वादग्रस्त ठरलेले मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तशी तक्रारही केली आहे. 


शिंदे गटातील फुटलेल्या आमदारांवर 'गद्दार' म्हणून शिक्का बसलेला असून यातील अनेक आमदारांना आगामी निवडणूक जिंकणे हे आव्हानात्मक ठरले आहे. त्यातच शिंदे गटाच्या काही जागांवर भारतीय जनता पक्ष आत्तापासूनच दावा करू लागला आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली आणि आता त्यांच्या दृष्टीने शिंदे गटाचे महत्व संपले आहे त्यामुळे भाजप शिंदे गटाला विविध प्रकारे त्रास देवू लागला असून हे सरकार आता फार काळ टिकणार नाही असा अंदाज विरोधक लावत असताना भाजपचे काही जेष्ठ मंत्री आणि नेते हे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पाहू इच्छित आहेत. भाजपच्या हालचाली शिंदे गटाच्या लक्षात आल्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेची फोडलेली शक्ती पुन्हा एकत्र येण्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी सूचक विधान केले आहे.


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना हे सद्या कायद्याची लढाई लढत आहेत. विद्यमान शिंदे सरकार हे घटनात्मक नसून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ते कोसळू शकते असे घटनेचे अभ्यासकही सांगतात. एकीकडे न्यायालयाची टांगती तलवार आणि दुसरीकडे भाजपचे छुपे राजकारण यामुळे शिंदे गटाची कोंडी होत निघाली असल्याचे दिसत आहे. काही राजकीय उलथापालथ झालीच तर शिंदे गटातील अनेक आमदारांची भलतीच राजकीय गोची होणार आहे. त्यांना भाजपात जाणे किंवा पुन्हा शिवसेनेत परत जाणे असे दोनच पर्याय उरण्याची शक्यता आहे. सद्याचे राजकीय वातावरण देखील अस्थिरतेकडे निघालेले असताना आगामी काळात राजकीय नाट्य पुन्हा एकदा पाहायला मिळतेय की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. 


आता पुन्हा फुटलेली शिवसेना एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेला आली आहे. शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा आणि काय प्रयत्न करावेत याबाबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांची भाष्य केले आहे.  "आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. (Eknath Shinde, Uddhav Thackeray signs of coming together) बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी लोकं कधीही सोडून जात नाहीत. त्यामुळे निश्चितपणे असं काही घडलेलं आहे, ज्यामुळे लोक नाराज झाली आणि बाहेर पडली आहेत. ती गोष्ट नेमकी काय घडली याचं जसं मी आत्मपरिक्षण केलं तसं उद्धव ठाकरे यांनीही त्याचं आत्मपरिक्षण करावं. जर त्यांनी आत्मपरिक्षण केलं तर शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही" असे विधान केसरकर यांनी केले आहे त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा खळबळ सुरु झाली आहे. या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


उद्धव ठाकरे यांचे कौतुक !
शिंदे गटातील मंत्री आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि राष्टवादीचे अजित पवार यांचे देखील तोंडभरून कौतुक केले आहे. विविध विषयावर केसरकर यांनी शिर्डी दौऱ्यात भाष्य केले आहे परंतु "शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही" आणि "आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी लोकं कधीही सोडून जात नाहीत" या विधानांनी मात्र पुन्हा राजकरणात खळबळ उडवून दिली असल्याचे दिसत आहे. 


शिवसेनेची  दारे बंद !

बंडखोरांसाठी आता शिवसेनेची दारे बंद झाली आहेत अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारले आहे. हे सरकार फेब्रुवारी महिन्यात कोसळणार असल्याचे आपण आधीच सांगितले होते. त्यामुळेच केसरकर अशी भाषा बोलू लागले आहेत. आमची कायदेशीर बाजू भक्कम असून शिंदे गटात गेलेले १६ आमदार अपात्र होणार आहेत असेही संजय राउत यांनी म्हटले आहे.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !