BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ जाने, २०२३

'त्या' फटाका कारखान्याबाबत धक्कादायक माहिती समोर !

 



शोध न्यूज : चार महिलांचा जीव घेणाऱ्या बार्शी तालुक्यातील 'त्या' फटाका कारखान्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून हा कारखाना विनापरवाना सुरु होता त्यामुळे प्रशासनाकडे बोट दाखवले जाऊ लागले आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीजवळ असलेल्या फटाका कारखान्यात काल रविवारी दुपारी स्फोट होऊन मोठी आग लागली आणि या आगीत एकूण चार महिलांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली. आगीच्या या घटनेची राज्यभर चर्चा झाली आणि दुर्घटनेत जीवितहानी झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच या कारखान्याबाबत अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जेथे स्फोट झाला तेथे या कारखान्यासाठी प्रशासनाचा परवानाच नव्हता आणि परवानगी दिलेली जागा सोडून दुसऱ्याच ठिकाणी हा काखाना सुरु होता अशी धक्कादायक बाब समोर आली असल्याने प्रशासनाकडेही बोट दाखवले जाऊ लागले आहे. 


सदर फटाका कारखान्यास २००७ साली परवानगी मिळाली होती आणि युसुफ मणियार यांनी फटाका कारखाना सुरु केला होता. ज्या ठिकाणासाठी ही परवानगी देण्यात आली होती ते सोडून दुसऱ्याच जागेवर हा कारखाना विनापरवाना सुरु करण्यात आला होता. ज्या जागेसाठी परवाना देण्यात आला होता तो देखील नूतनीकारणासाठी प्रलंबित असल्याचे समजते त्यामुळे सद्या तरी कसलाच परवाना सक्रीय नव्हता. परवाना नसलेल्या जागेवर सुरु करण्यात आलेला हा 'उद्योग' होता.  कोणत्याच निकषाचे पालन न करता पत्र्याच्या शेडमध्ये गोदाम आणि फटाका बनविण्याचा कारखाना सुरु करण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. फटाका कारखाना अथवा फटाके विक्री यासाठी अनेक निर्बंध आणि नियम असतात. 


फटाका कारखान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १५ किलोपर्यंत परवाना दिला जातो. त्यापेक्षा अधिक दारू साठ्याचा कारखाना असल्यास The Petroleum and Explosives Safety Organization (PESO) मार्फत ही परवानगी दिली जात असते. येथील स्फोटाची तीव्रता पहिली तर नियमांपेक्षा अधिक दारूसाठा असण्याची शक्यता दिसत आहे. याची तपासणी होऊन सत्य समोर येईलच पण एवढ्या वर्षांपासून हा कारखाना परवाना नसलेल्या जागेवर सुरु होता तरी देखील प्रशासनाला याची माहिती मिळाली नव्हती काय ? हा सवाल आता प्रामुख्याने विचारला जाऊ लागला आहे. स्फोट होण्याचे आणि आग लागण्याचे नेमके कारण तपासात समोर येईल परंतु आजवर विनापरवाना कारखाना कसा सुरु राहिला ? याबाबत विचारणा होऊ लागली आहे. 


  • फटाका कारखाना स्फोट प्रकरणी पोलिसांनी  गुन्हा दाखल केला असून कारखान्याचे मालक युसुफ मणियार आणि नाना पाटेकर यांच्या विरोधात हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पांगरी पोलीस ठाण्यात भादवि कलम 304, 337, 338, 285, 286, 34, भारतीय विस्फोटक अधिनियम 1884 चे कलम पाच आणि नऊ ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारखान्याचे दोन्ही मालक बेपत्ता झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

'बाळासाहेबांची शिवसेना' चे बार्शी येथील पदाधिकारी आणि माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी याबाबत प्रचंड संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे. बेकायदेशीर असलेला हा मोठा कारखाना एवढ्या वर्षापासून सुरु होता मग प्रशासनाने डोळेझाक का केली ? प्रशासनाला हे माहिती नव्हते काय ? रस्त्याच्या कडेला असलेला एवढा मोठा कारखाना सुरु होता तेंव्हा प्रशासनाला याची माहिती कशी मिळाली नाही ? फटका कारखान्यासाठी नियम असतात आणि त्याची तपासणी होत असते पण येथे काहीच झालेले दिसत नाही. माळरानावर पत्र्याच्या शेडमध्ये असा कारखाना सुरु होता. या दुर्घटनेत  चार महिला मृत्युमुखी पडल्या आणि काही जण जखमी झाले यास जबाबदार कोण ? असा सवाल विचारात भाऊसाहेब आंधळकर यांनी प्रशासकीय अधिकारी यांना जबाबदार धरून कारवाईची मागणी केली आहे. 


कारखानदार दोन मालकांसह बार्शी येथील तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी या सर्वाना जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली असल्याचे आंधळकर यांनी सांगितले आहे. (The blasted firecracker factory was revealed to be illegal) एकूण हे प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचू लागले असून फटक्याच्या आगीची झळ प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू लागली असल्याचे दिसत आहे. 


  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !