BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जाने, २०२३

विठ्ठलाच्या नकली सोन्याचे गौडबंगाल काय ? चौकशीची मागणी !

 


शोध न्यूज : विठ्ठल मंदिरातील नकली सोन्याची राज्यभर चर्चा झाली परंतु आता या प्रकरणावर संशय व्यक्त करण्यात येवू लागला असून विठ्ठल चरणी अर्पण केलेले सोने खोटे आहे असे सांगणाऱ्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केली आहे.


महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून गरीब, सामान्य वारकरी आणि भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायपीट करून पंढरीत पोहोचत असतो आणि आपल्या परिस्थितीनुसार परंतु मोठ्या श्रद्धेने आणि आस्थेने विठ्ठलाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करीत असतो . अनेक भाविक सोन्या चांदीचे दागिने विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो. कित्येक गरीब आणि अत्यंत सामान्य वर्गातील भाविक रोख रकमेची देणगी देतात. अशी देणगी देण्यासाठी कुणी त्यांच्यावर सक्ती केलेली नसते तरीही ते श्रद्धेपोटी अशी देणगी देतात. केरसुणी तयार करून विकणाऱ्या महिलेने देखील विठ्ठलचरणी लाख रुपयांची देणगी दिली होती. रोख रकमेशिवाय चांदीच्या धातूसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये पाळणे, घोडे, डोळे, निरांजन, जोडवी, पैंजण, हळदी कुंकवाच्या डब्या, तबक अशा विविध प्रकरच्या वस्तू भाविक दानपेटीत टाकतात. भाविकांनी दिलेल्या सोन्याचा मोठा खजिना मंदिर समितीकडे जमा झालेला आहे. 


आता मात्र भाविकांनी विठ्ठल चरणी अर्पण केलेल्या दागिन्यात नकली सोने चांदीचे दागिने आढळले असल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे. एवढेच काय पण पोते भरून अशा वस्तू साठल्या असल्याचे सांगितले गेले आहे. भाविकांनी अशा नकली वस्तू अर्पण केल्याचे सांगितले गेले असले आणि हा विषय चर्चेचा झाला असला तरी अनेकांना हा दावा रुचलेला नाही. भाविक आपल्या लाडक्या विठूरायाची अशी फसवणूक कशासाठी करील ? असा प्रश्न गेल्या दोन दिवसापासून चर्चिला जात आहे. विठुचरणी दागिने अर्पण करण्याची भाविकांना कुणी सक्ती करीत नाही शिवाय प्रचंड पायपीट करून आणि मोठ्या श्रद्धेने पंढरीला जाणारा भाविक त्याच्याच लाडक्या देवाची फसवणूक करील हे कुणालाच पटणारे नाही त्यामुळे याबाबत वेगळीच चर्चा आणि शंका उपस्थित करण्यात येत आहे. 


मंदिरातील नकली सोन्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून ही चर्चा सुरु असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत थेट आक्षेप घेतलं आहे. स्वाभिमानी संघटनेच्या मागणीला समाजातून देखील पाठींबा मिळताना दिसत आहे. स्वाभिमानीने तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी महसूल आणि पोलीस यंत्रणेला याबाबत लेखी पत्र दिले असून चौकशीची मागणी केली आहे. विठ्ठल चरणी अर्पण केलेले दागिने खोटे आहेत असे सांगणाऱ्या सर्वांचीच चौकशी करण्याची मागणी सचिन पाटील यांनी केली आहे. शेकडो किलोमीटर पायपीट करून, तासनतास दर्शनबारीमध्ये उभे राहून विठ्ठलाच्या दर्शानासाठी आतुरलेला भक्त विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी बनावट दागिने अर्पण करू शकेल का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हे न पटण्यासारखे आणि अशक्य असून यात नक्की काहीतरी गौडबंगाल आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणीच त्यांनी केली आहे. 


खऱ्या सोन्यावर डल्ला मारून खोटे सोने विठ्ठल मंदिराच्या खजिन्यात आणून टाकण्याचा प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे. या एकूण प्रकारची सखोल चौकशी केली पाहिजे तसेच सीसीटीव्ही आधारे पडताळणी केली पाहिजे. या सगळ्या प्रकारची शक्य तितक्या लवकर चौकशी करून सत्य विठ्ठल भक्तांच्या समोर येणे गरजेचे आहे. सदर प्रकरणी गंभीरपणे चौकशी करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करील आणि होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी शासनाची असेल असा इशाराही 'स्वाभिमानी' चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी दिला आहे.   


मंदिरातील नकली सोन्याबाबत जनतेतून अशाच प्रकारचा सूर उमटत असताना आणि विठ्ठलाचे भाविक असा प्रकार करणारच नाहीत असा विश्वास व्यक्त होत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विषयाला हात घातला आहे आणि थेट चौकशीची मागणी केली आहे त्यामुळे स्वाभिमानी संघटनेला धन्यवाद दिले जात आहेतच परंतु या मागणीला जनतेतून देखील मोठा पाठींबा मिळताना दिसत आहे. (Suspected theft of gold from Vitthal temple, Demand for inquiry) प्रांताधिकारी, तहसीलदार आणि उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या नावाने सचिन पाटील यांनी  लेखी पत्राद्वारे केलेल्या या मागणीचे पुढे काय होतेय याकडेच आता भाविकांचे आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 



  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !