BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जाने, २०२३

बनावट लग्न लावून फसवणूक करणारी राज्यव्यापी टोळी जेरबंद !


शोध न्यूज : बनावट लग्न लावून आर्थिक फसवणूक करणारी एक मोठी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून पाच महिलांसह ९ जणांना अटक करण्यात आली आहे. 


गेल्या काही वर्षात तरुणांची लग्न जुळणे ही एक कठीण समस्या होत असतानाच लग्नाळू तरुणांना फसविणाऱ्या टोळ्या जन्माला आल्या आहेत. लग्न करू इच्छिणाऱ्या तरुणांना मध्यस्थामार्फत गाठून त्याला लग्न जुळवून देण्याचे अमिश दाखवले जाते. खोटी नवरी उभी करून लग्न देखील केले जाते. लग्न जुळविण्यासाठी आधी भरभक्कम रक्कम घेतली जाते आणि लग्न होताच नकली नवरी सोन्याच्या दागिन्यांसह पळून जाते. असे अनेक प्रकार मागील काही काळात घडले असून फसवणूक झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अशा भामट्या टोळ्यांना पोलिसांनी गजाआड देखील केलेले आहे परंतु अशा प्रकारची फसवणूक सर्रास सुरु असून आणखी एका राज्यव्यापी टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या टोळीत पाच महिला कार्यरत होत्या आणि त्यांनी अनेकदा गंडा घातलेला आहे. 


राज्यात विविध ठिकाणी लग्नाळू तरुणांना फसविणाऱ्या या टोळीने कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड येथील तरुणांना अशाच प्रकारे फसवले. अविनाश दत्तात्रय घारे, विकास गणपती मोगणी या दोन युवकांशी लग्नाचा बनाव करून सोन्याच्या दागिन्यांसह  ४ लाख, ४० हजाराची फसवणूक केली होती.सदर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच २३ डिसेंबर २०२२ रोजी अशा एका टोळीच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीत एकूण ९ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे एकूण ९ जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करून पोलीस या टोळीचा शोध घेत होते. पोलिसांनी सुलतानगादे, मदनवाडी, हडपसर पूणे, माळवाडी, भिलवडी, नाशिक, लातूर अशा विविध ठिकाणी या तपासासाठी पथके रावण केली होती. अत्यंत गुप्त पद्धतीने तपास करीत अखेर पोलिसांनी या टोळीचा छडा लावला. 


बनावट लग्न करून आर्थिक गंडा घालत असलेल्या या टोळीतील संध्या विजय सुपणेकर ( माळवाडी. सांगली), ज्ञानबा रामचंद्र दवंड उर्फ संतोष ज्ञानदेव सुतार (मदनवाडी ता. इंदापूर) तसेच खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथील  विश्वजीत बजरंग जाधव, जगदीश बजरंग जाधव, वर्षा बजरंग जाधव आणि (A state-wide gang of fake marriage scams arrested) शारदा ज्ञानदा दवंड (, नाशिक), दिपाली केतन बेलोरे ( हडपसर), रेखा गंगाधर कांबळे (अंबीका रोहिना) याना जेरबंद करून त्यांची रवानगी गजाआड करण्यात आली आहे. बनावट लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीने आणखी ज्यांना फसवले असेल त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. या टोळीकडून आणखी काही प्रकाराने उघडकीस येण्याची शक्यता आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !