BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जाने, २०२३

शरद पवार यांच्या पायलटची झाली एक चूक आणि धावपळ !

 



शोध न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख आणि देशाचे प्रमुख नेते शरद पवार यांना घेवून जाणाऱ्या हेलीकॉप्टरच्या पायलटने एक चूक केली आणि सगळ्यांचीच प्रचंड धावपळ उडाली. 


राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या पायलटने केलेल्या एका चुकीमुळे  प्रचंड गोंधळ उडाला आणि अनेकांची एकच धावपळ होण्याची वेगळी घटना घडली आहे. नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर शरद पवार गेले असताना त्यांचे हेलिकॉप्टर नको तेथेच उतरले त्यामुळे हा गोंधळ उडाला. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर शरद पवार यांच्या स्वागतासाठी सगळे थांबले होते, त्यांचं स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती परंतु त्यांचे हेलिकॉप्टर पायलटच्या चुकीमुळे दुसरीकडेच उतरले आणि तेथे त्यांच्या स्वागतासाठी कुणीच नव्हते. त्यानंतर पायलटच्या लक्षात चूक आली पण शरद पवार हे त्यांच्यासाठी नसलेल्या हेलिपॅडवर उतरलेही आणि एका गाडीत बसून पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले. त्यानंतरही गोंधळ काही थांबला नाही. 


शरद पवार हे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन व माजी आमदार चंदशेखर घुले-पाटील यांची कन्या डाॅ. निवेदिता यांच्या  विवाहासाठी रविवारी गेले असताना सोनई येथे हा प्रकार घडला. सोनई शिंगणापूर येथे एक हेलिपॅड तयार करण्यात आले होते परंतु हे हेलिपॅड माजी मंत्री विश्वजित कदम यांच्यासाठी होते. मुळा साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर शरद पवार यांचे हीलिकॉप्टर उतरणार होते आणि त्यासाठी या हेलिपॅडवर मोठी गर्दी जमा झाली होती, शरद पवार यांच्या स्वागताची तयारी करून येथे अनेक नेते शरद पवार यांची वाट पाहत थांबले होते. परंतु पवार यांचे हेलिकॉप्टर येथे न उतरता मुलांनी माथा येथे तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर उतरले. येथे फक्त एक मोटार आणि दोन सुरक्षा रक्षक होते. हे पाहून पायलटला आपली चूक झाल्याचे लक्षात आले  स्वागत, सुरक्षा आणि प्रोटोकॉल  या कशाचाही विचार न करता शरद पवार खाली उतरून थेट मोटारीकडे गेले. 


शुकशुकाट असलेल्या हेलिपॅडवर उतरून सरळ ते इनोव्हा गाडीत जाऊन बसले आणि त्यांनी चालकाला विवाहस्थळी घेऊन जाण्यास सांगितले. चालक संपत मारकड यांची अवस्था तर पाहण्यासारखी झाली. चालकाने आपली गाडी विवाहाच्या ठिकाणी दामटली. कसले स्वागत नाही की कसला लवाजमा नाही. सुरक्षेचा आणि प्रोटोकॉलचा तर विषयच उरला नव्हता.  तिकडे कारखाना हेलिपॅडवर लोक वाट पाहात उभेच होते आणि अजून कसे पवार साहेब येत नाहीत यामुळे चिंतेत दिसत होते. इकडे पवार साहेब विवाह मंडपात पोहोचले आणि तेथेही खळबळ उडाली. कसलाही लवाजमा आणि सुरक्षा नसताना एकटे शरद पवार मंडपात आल्याने तेथेही सगळ्यांची धावपळ सुरु झाली. कारखाना हेलिपॅडवर मात्र अजूनही सगळ्यांचा नजर आकाशात दूरदूरपर्यंत पोहोचत होत्या आणि शरद पवार यांचे हेलिकॉप्टर शोधत होत्या. पवार मंडपात पोहोचले तरी अजून येथे स्वागतासाठी नेते खोळंबले होते. 


शरद पवार हेलिकॉप्टरमधून उतरून विवाह स्थळाकडे गेल्यानंतर चूक लक्षात आलेल्या पायलटने आपले हेलिकॉप्टर पुन्हा आकाशात झेपावले आणि कारखाना हेलिपॅडकडे नेले. आकाशात हेलिकॉटर येताना दिसताच कारखाना हेलिपॅडवर थांबलेले नेते सुखावले. सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आणि नेते स्वागतासाठी तयार झाले. हेलिकॉप्टर हेलिपॅडवर स्थिरावले, पंखे थांबले पण शरद पवार हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना दिसत नाही हे पाहून हेलिपॅडवर थांबलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता दिसू लागली. 


हेलिकॉप्टर तर आले पण शरद पवार काही आलेले नव्हते. (Sharad Pawar's pilot made a mistake and ran away) हा काय प्रकार आहे हे कुणालाच समजायला मार्ग नव्हता. अखेर जेंव्हा त्यांना याबाबत समजले तेंव्हा आणखी नवी पळापळ सुरु झाली. आपण येथेच आणि पवार साहेब विवाहस्थळी दाखल झाले आहेत हे समजल्यावर सगळेच विवाह मंडपाकडे धावत सुटले. पायलटच्या एका चुकीने अनेकांची मोठी धावपळ केली पण पवार साहेब मात्र विवाह सोहळ्यात रमलेले होते. 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !