शोध न्यूज : सरकारी डॉक्टर महाशयांनी आपले उग्र स्वरूप दाखवत चक्क सरकारी दवाखान्याचीच मोठी तोडफोड केल्याने वैद्यकीय वर्तुळात भलतीच खळबळ उडाली आहे.
डॉक्टर म्हटलं की शांत आणि संयमी व्यक्तिमत्व समोर उभे राहते. मृत्युच्या दारातील रुग्णांना जीवदान देण्याचे महान काम डॉक्टर मंडळी करीत असतात म्हणून डॉक्टरांना देवाचेच स्वरूप मानले जाते आणि दवाखाना हे मंदिर पहिले जाते. शांतपणे रुग्णांची तपासणी करून विश्वासाच्या नात्याने सल्ला देणारे डॉक्टर महाशय क्वचितच संतापलेले दिसतात. फलटण येथील एक डॉक्टर महोदय मात्र केवळ संतापले नाही तर त्यांनी आपला रुद्रावतारही दाखवला. आरोग्याचे मंदिर असलेल्या फलटण येथील उप जिल्हा रुग्णालयातच त्यांनी तोडफोड करून मोठा राडा घातला. साहजिकच या घटनेची चर्चा रंगू लागली असून त्यांच्याबद्ध्ल संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे.
वरिष्ठ वैद्यकीय असलेल्या या डॉक्टर महाशयांनी फलटण उप जिल्हा रुग्णालयातील कार्यालयाच्या दरवाजे आणि खिडक्यांची जोरदार तोडफोड केली आहे. हे महाशय वरिष्ठ डॉक्टर असले तरी त्यांचे वर्तन आधीही वादग्रस्त राहिलेले असल्याचे सांगितले जात आहे. फलटण येथील उप जिल्हा रुग्णालयाचा कारभार हा गेल्या चार वर्षापासून देवाच्या भरवशावरच सुरु आहे आणि तक्रारी करूनही कुणी याची दखल घेतलेली नाही. चार वर्षापूर्वी बदलून आलेल्या या डॉक्टर महाशयाच्या वर्तनाने कर्मचारी देखील वैतागलेलेच आहेत परंतु नाईलाज म्हणून निमुटपणे सगळे सहन करीत ते काम करीत आहेत. वाद निर्माण होईल अशी वक्तव्ये करणे, कामचुकारपणा करणे अशा या डॉक्टरच्या सवयी बनल्या आहेत.
अचानकपणे या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाने शिमगा करीत आणि कनिष्ठ अधिकारी , कर्मचारी यांच्याही नावाने संताप व्यक्त करीत उप जिल्हा रुग्णालयातील कार्यालयाची तोडफोड केली. रुग्णालयात काचांचा खच पडला आणि शांत रुग्णालय अचानक अशांत बनले गेले. यापूर्वी देखील त्यांनी शासकीय मालमत्तेचे असेच नुकसान केल्याचे सांगितले जात आहे. (The senior doctor broke the office of Sub District Hospital) कर्मचारी या डॉक्टरबाबत अनेक तक्रारी करताना दिसतात आणि या महाशयामुळे महिला कर्मचारी देखील भयग्रस्त झाल्या आहेत. दरम्यान तोडफोड केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याचे आदेश तसेच गुन्हा दाखल करण्याचेही आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सुभाष चव्हाण यांनी दिले असल्याचे समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !