शोध न्यूज : पंढरीच्या विठूरायाला एका भाविकाने पावणे दोन कोटींच्या दागिन्यांचे दान केले असून या भाविकाने आपली ओळख देखील अज्ञात ठेवली आहे. हे दान आजवरचे सर्वात मोठे दान असल्याचे सांगितले जात आहे.
राज्याच्या कोनाकोपऱ्यातून आणि देश विदेशातून देखील भाविक पंढरीच्या विठुमाउलीचे दर्शन घेण्यासाठी पंढरीत दाखल होतात. विठ्ठलाचे भक्त हे बहुसंखेने सामान्य आणि मध्यमवर्गीय अशाच पद्धतीचे आहेत तरी देखील गरीबातील गरीब देखील पांडुरंगाला आपल्याला शक्य होईल ते दान देत असतो. अगदी केरसुणी विकणाऱ्या महिलेपासून उद्योगपतीपर्यंत भाविक विविध प्रकारे विठूमाऊलीच्या चरणी मोठ्या भक्तीभावाने दान करीत असतात. दान करणारे काही भाविक मोठे दान करूनही आपले नाव जाहीर होऊ देत नाहीत. अशाच प्रकारे एका अज्ञात भाविकाने पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी पावणे दोन कोटी रुपयांच्या दागिन्यांचे दान केले आहे. वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह केला जातो (Highest ever donation to Vitthala of Pandharpur from a female devotee) आणि याच मुहूर्तावर जालना येथील एका भाविक महिलेने हे दान केले आहे.
विठूराया आणि रुक्मिणी माता यांच्यासाठी सोन्याचे दोन मुकुट तसेच मोहन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, जोडवी, मंगळसूत्र अशा दागिन्यांचा या दानात समावेश आहे. शिवाय नित्योपाचारासाठी लागणारे चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवाचा चांदीचा आरसा अशा किमती वस्तूंचे देखील दान करण्यात आले आहे. एक लाख किंवा त्याहून अधिक देणगी दिलेल्या भाविकांचा मंदिरे समितीच्या वतीने सत्कार करून देवाचा फोटो भेट दिला जातो परंतु या भाविकाने एवढे मोठे दान दिलेले असतानाही समितीकडून होणारा सत्कार विनम्रपणे नाकारला असून आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती त्यांनी केली आहे. आजवरच्या दानात हे सर्वात मोठे दान असल्याचे मानले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !