BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ जाने, २०२३

पत्नीच्या "तेराव्या" दिवशीच पतीनेही घेतला अखेरचा श्वास !

 


शोध न्यूज : पत्नीच्या मृत्युनंतर तेराव्या दिवशीच पतीनेही अखेरचा श्वास घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली असून पत्नीच्या पाठोपाठ पतीनेही जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


पती - पत्नीच्या नात्यात प्रेमाची आणि त्यागाची मोठी गुंफण असते. परस्परांच्या परिश्रमातून आणि बिकट परिस्थिती असतानाही संसार फुलवला जातो.  या नात्यात अत्यंत घट्टपणा असतो त्यामुळे परस्परांच्या शिवाय जगणे कठीण होत असते. पतीच्या निधनानंतर पत्नीला धक्का बसून तिनेही अखेरचा श्वास घेतल्याची अनेक प्रकरणे आहेत तसे पत्नीचे निधन झाल्यावर पतीनेही आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. कित्येकदा जोडीदारांच्या जाण्याचा धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येवून मृत्यू झाले आहेत आणि दोघांचे अंत्यसंस्कार एकाच चितेवर केले गेले आहेत. अशाच प्रकराची आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 


जळगावच्या मेहरूण भागात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीच्या निधनानंतर तेराव्याच्या कार्यक्रमादिवशीच वृद्ध पतीनेही अखेरचा श्वास घेतला. ७५ वर्षे वयाच्या शकुंतलाबाई श्रीराम बोडखे यांचे दोन आठवड्यापूर्वी निधन झाले होते त्यामुळे त्यांचे पती श्रीराम बोडखे हे अत्यंत दु:खात होते. आयुष्याचा जोडीदार गेल्याने ते मनाने खचून गेले होते. दु:ख पचवत काही दिवस त्यांनी काढले पण पत्नीच्या तेराव्या दिवशी मात्र त्यांनीही जगाचा निरोप घेतला. पत्नीच्या निधनानंतर 'तेराव्या'चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिवशी तर त्यांना पत्नीचा विरह असह्य झाला आणि ७८ वर्षे वयाच्या श्रीराम बोडखे यांनी देखील त्याच दिवशी आपला प्राण सोडला. 


तेराव्याच्या दिवशी श्रीराम बोडखे हे सकाळपासूनच अस्वस्थ होते. त्यातून त्यांची प्रकृती ढासळली होती. सर्वांशी चांगले राहा, सचोटीने वागा असे ते आपल्या मुलांना सांगत होते. सकाळपासून त्यांची निरोपाची भाषा सुरु होती पत्नीचा तेराव्याचा कार्यक्रम पार पडला आणि पत्नीच्या विरह असह्य झालेल्या श्रीराम बोडखे यांनी देखील जगाचा निरोप घेतला. (Sad! The death of the husband in the absence of his wife) पत्नीच्या पाठोपाठ वृद्ध पतीनेही अनंताचा प्रवास सुरु केला. या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून अतूट प्रेमाची आणखी एक कहाणी समोर आली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !