BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ जाने, २०२३

गड्डा यात्रेत खून करून राज्याबाहेर निघालेल्या आरोपींना बेड्या !

 


शोध न्यूज :सोलापूरच्या गड्डा यात्रेत भरदिवसा खून करून परराज्यात पळून निघालेल्या चार आरोपींना पोलिसांनी मोठ्या कौशल्याने पकडले असून त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 


सोलापूर येथील गड्डा यात्रेत भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी आर्थिक कारणावरून एका व्यापाऱ्याचा भोसकून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. भर यात्रेत खुनासारखा प्रकार घडल्याने भाविकांत देखील मोठी खळबळ उडाली होती. पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून व्यापारी अतिफ अख्तार साह या २१ वर्षाच्या तरुण व्यापाऱ्याचा खून करण्यात आला होता तर अन्य दोन जखमी झाले होते. बिहार राज्यातून हा व्यापारी गड्डा यात्रेत व्यवसाय करण्यासाठी आलेला होता आणि त्याचा यात्रेत खून करण्याची धक्कादायक घटना घडली होती. यात्रेच्या गर्दीत हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. 


खून करून आरोपी लगेच तेथून निसटले होते त्यामुळे आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर एक आव्हान उभे होते. सिद्धेश्वर यात्रेत विक्रेत्यांची  मोठी गर्दी असते आणि हे विक्रेते अन्य राज्यातून देखील आलेले असतात. या विक्रेत्यांच्या संदर्भात फारशी माहितीही  नसते त्यामुळे या खुनातील आरोपीचा छडा लावणे ही तशी अवघड बाब होती परंतु पोलिसांनी अत्यंत जलद गतीने या आरोपींना पळून जात असतानाच बेड्या ठोकल्या आहेत. सदर आरोपी देखील बिहार राज्यातील असून ते महाराष्ट्रातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरले गेलेले शस्त्र देखील हस्तगत केले आहे. 


पोलिसांनी तातडीने आरोपींना जेरबंद करण्याच्या हालचाली केल्या, रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टॅन्ड यासह राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले. घटना घडल्यानंतर आरोपींनी मोबाईल बंद करून ठेवले होते. आरोपींचा तपास आव्हानात्मक बनला असतानाच कुंभारी, अक्कलकोट मार्गावरून आरोपी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जलद गतीने हालचाल केली आणि पळून जात असलेल्या आरोपींना बेड्या ठोकल्या. अरविंद ऊर्फ बिदर कृष्णा सिंह (वय ४४), गुलशाद शमशाद खान (वय २८), नौशाद मुस्ताक अहमद कादरी (वय २५), इब्रार इस्तीकार खान (वय २५), एरार ऊर्फ कल्लू इस्तकार खान (वय २१)  अशी या आरोपींची नावे असून सगळेच आरोपी हे बिहारमधील आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून, फौजदार चावडी पोलीसांच्या ताब्यात केले आहे.  नौशाद अहमद कादरी या आरोपीने चाकू भोसकून खून केल्याचा आरोप आहे. 


गड्डा यात्रेत खून केल्यानंतर चारही आरोपी तेथून तत्काळ पसार झाले होते आणि अक्कलकोट मार्गाने ते बिहार राज्यात परत जात होते. (Murder in Solapur Yatra, four accused from Bihar arrested)  महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर त्यांचा शोध घेणे अधिक जिकीरीचे झाले असते परंतु पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास केल्यामुळे ते राज्यातून बाहेर जाण्याआधीच पोलिसांना सापडले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना जेरबंद करून आणले आणि त्यांच्याकडून खुनात वापरलेला चाकू देखील हस्तगत केला आहे. या आरोपींना पकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांना २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !