शोध न्यूज : 'थांब, तुला संपवतोच..' म्हणत आणि खंडणी मागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यावर गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे एका धक्कादायक प्रकार घडला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेयाच्या पुण्यातील एका नेत्यावर धमकी देत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली असून पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष असलेल्या समीर थिगळे यांच्यावर गुंडाने गोळ्या झाडल्या आहेत परंतु सुदैवाने थिगळे यातून नशिबानेच बचावले आहेत. प्राप्त माहितीनुसार मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे हे राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील आपल्या घरासमोर उभे असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. "मी खेडचा भाई आहे, एकाला घालवलय ... तुलाही माज आलाय ... तुलाही संपवतोच .." असे म्हणत थिगळे यांच्यावर पिस्तुल रोखले आणि गुंडांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी थिगळे यांचे कुटुंबही तेथे उपस्थित होते. त्यांच्यासमोर दोन गुंडांनी थिगळे यांच्यावर पिस्तुल चालवले.
गुंडांनी जिल्हाध्यक्ष थिगळे यांच्या छातीवर पिस्तुलातून गोळी चालवली परंतु ऐनवेळी पिस्तुल चाललेच नाही आणि त्यामुळे गोळी सुटली नसल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर मात्र या गुंडांनी दुसरी गोळी हवेत झाडली. थिगळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून दोन्ही गुंड तेथून पसार झाले. सदर प्रकरणी मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे या दोघांच्या विरोधात राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर यापूर्वी मोक्का आणि खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (firing, Maharashtra Navnirman Sena leader attacked for extortion) आता आणखी हा एक गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी पसार झाले आहेत. घटना घडताच पोलीस या आरोपींच्या मागावर असून या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. ऐनवेळी पिस्तुल बिघडले नसते तर थिगळे यांच्या छातीत गोळी घुसली असती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे पण गुंडांची दहशत मात्र वाढीला लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !