BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ जाने, २०२३

ट्रॅक्टर चोरांची मोठी टोळी उघडकीस ! पंढरपूर तालुक्यातील तिघांना बेड्या !!

 


शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात ट्रॅक्टरची चोरी करणारी टोळी पंढरपूर तालुक्यातच कार्यरत असल्याचे उघडकीस आले असून या टोळीकडून एक कोटी पंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. 

  

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी ट्रॅक्टर आणि ट्रॉली यांची चोरी होत होती. या चोरीमुळे ट्रॅक्टर मालक हैराण झालेले होते तसेच आपलाही ट्रॅक्टर चोरीला जातोय काय अशी भीती ट्रॅक्टर मालकातून व्यक्त होत होती. ट्रॅक्टर, ट्रॉली चोरीला जात होत्या परंतु त्याचा तपास मात्र लागत नव्हता. मोहोळ पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मात्र दमदार कारवाई करून ट्रॅक्टर चोरांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरीचे ट्रॅक्टर, ट्रॉली हस्तगत करण्यात आले आहेत. पंढरपूर, मोहोळ, माढा, बार्शी अशा ठिकाणावरून चोरलेले १३ ट्रॅक्टर, ९ ट्रेलर आणि १ ब्लोअर यंत्र असा १ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल या टोळीकडून पोलिसांनी हस्तगत गेला आहे. तीन संशयिताना अटक करून पोलिसांनी हा मुद्देमाल मिळवला आहे. मोहोळ पोलिसांची ही फार मोठी कामगिरी मानली जात आहे. मोहोळ पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून आणि सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील माढा, पंढरपूर, बार्शी व मोहोळ या तालुक्यातील ट्रॅक्टर चोरीच्या तक्रारी गेल्या पाच वर्षांपासून वाढत होत्या परंतु ट्रॅक्टर चोर मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हते. चोरांच्या हुलकावण्यामुळे पोलिसांच्या समोर देखील हे एक मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यासाठी  उपविभागीय पोलीस अधिकारी भारती, पोलीस निरीक्षक सायकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली होती आणि याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. अखेर मोहोळ पोलिसांनी या ट्रॅक्टर चोरांच्या मुसक्या आवळल्या असून चोरांची ही टोळी कुठली बाहेरची नसून ती सोलापूर जिल्हयातील पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात देखील आश्चये व्यक्त होत असून हा चर्चेचा विषय बनला आहे.

  
पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील पप्पू कुबेर ओव्हाळ, उत्कर्ष उर्फ सोन्या नागनाथ पवार, बंडू कुमार पवार यांचं मुसक्या आवळून चोरलेले १३ ट्रॅक्टर, ९ ट्रेलर आणि १ ब्लोअर यंत्र असा १ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.   सदर संशयित अत्यंत कौशल्याने ट्रॅक्टरची चोरी करीत होते. ट्रॅक्टर चालकाशी सलगी करून, साखर कारखाना परिसरात हेरगिरी करीत ट्रॅक्टर, ट्रेलर चोरले जात होते. ट्रॅक्टर चालकाबरोबर सलगी करून त्याच्याकडून दिवसभर केल्या जात असलेल्या कामाची संपूर्ण माहिती मिळवत होते. शिवाय हा चालक ट्रॅक्टर सोडून कुठे आणि किती वेळ बाजूला जातो याचा देखील ते अभ्यास करीत होते. त्याच्या आधारे चालकाला फसवत बेमालूमपणे ट्रॅक्टर चोरून नेले जात होते. चोरलेला ट्रॅक्टर ओळखता येऊ नयेयासाठी  चेसीचा नंबर ग्राइंडरच्या मदतीने घासून नष्ट करीत असत आणि  मेकॅनिकच्या मदतीने 'कागदपत्रे आणून देतो' असे म्हणत या चोरलेल्या ट्रॅक्टरची लाखो रुपयांना विक्री करत असत.अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. 


चोरीला गेलेले आणि पोलिसांना मिळालेले ट्रॅक्टर पोलिस स्टेशनला आणण्याचे मोठे आणि  परिश्रमाचे काम पोलिसांना करावे लागले. पोलिसांच्या या कामगिरीचे जनतेतून, ट्रॅक्टर मालकातून तर मोठे कौतुक होतच आहे पण जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी आज मंगळवारी मोहोळ येथे येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस नाईक अमोल घोळवे, प्रवीण साठे, सिद्धनाथ मोरे, महिला पोलीस नाईक अनुसया बंडगर यांचा  सत्कार केला. मोहोळ पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या चार कर्मचाऱ्यांना या कामगिरीबाबत ३५ हजार रुपयांचे रोख रिवार्ड पोलीस अधीक्षकांनी घोषित केले  आहे शिवाय त्यांना प्रशस्तीपत्रकही देण्यात आले आहे. 


चोरीचे ट्रॅक्टर मोहोळ पोलिसांना सापडले असल्याची बातमी सगळीकडे पसरली आणि ज्यांचे ट्रॅक्टर चोरीस गेले होते त्यांनी मोहोळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना मिळलेल्या ट्रॅक्टरमध्ये आपला ट्रॅक्टर आहे का ? याची पाहणी केली जात होती. (Pandharpur taluka gang of tractor thieves exposed) सापडलेले ट्रॅक्टर ज्यांचे आहेत त्यांना ओळख पटवून हे ट्रॅक्टर देण्यात येतील अशी माहितीही जिल्हा  पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी दिली आहे. ट्रॅक्टर मालकांकडून देखील पोलीस अधीक्षकांच्या सत्कार करण्यात आला आहे. पोलिसांना हुलकावणी देत शेतकरी बांधवांचे  ट्रॅक्टर चोरून दुसरीकडे विकणारे हे पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील असल्याचे उघडकीस आल्याने मात्र आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.



.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !