शोध न्यूज : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा पुनः एकदा अपघात झाला असून पस्तीसपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून चौदा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अलीकडे नेहमीच अपघात होऊ लागले असून ब्रेक फेल होणे, स्टेअरिंग रॉड तुटणे अशा कारणानेच हे अपघात होत असल्याने या बसची देखबाल दुरुस्ती करण्यात येते की नाही याचीच शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. आज लातूर जिल्ह्यातील बोरगाव काळे परिसरात बसचा असाच मोठा अपघात झाला असून जीवितहानीचे मात्र वृत्त नाही. धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आहे बस रस्त्यावरून खाली जात मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. समोरच्या बाजूने बस आदळली असल्याने चालकाला दुखापत झाली आहे. बसमधील अन्य प्रवाशी देखील या अपघातात जखमी झाले असून यातील १४ प्रवाशी गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताने वाहतुकीत विस्कळीतपणा आला होता परंतु पोलिसांनी काही वेळेत वाहतूक सुरळीत केली.
सदर लातूर - पुणे- बल्लभनगर ही बस निलंगा आगारातून निघाली आणि पुण्याच्या दिशेने जात असताना मुरुडजवळ बोरगाव काळे परिसरात हा अपघात झाला. पुलावरून बस खाली उतरली आणि रस्ता सोडून ढिगाऱ्यावर ती आदळली. दरम्यान प्रवाशी देखील जोरडे आदळले असून बसच्या समोरच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. बसमधून महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिक देखील प्रवास करीत होते. या अपघाताच्या दरम्यान प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला. प्रवासी घाबरून आरडाओरडा करीत होते. यातील अनके प्रवासी रक्तबंबाळ झाले आहेत.गंभीररित्या जखमी झालेल्या १४ जणांना लातुरच्या शासकीय रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे. (Major accident of State Transport Corporation passenger bus) काही जखमी प्रवाश्यांवर मुरुड येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.नुकतेच सिन्नर-शिर्डी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले होते. आजचा अपघातही मोठा असून सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !