शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील एका कृषी केंद्राचे मालक आणि त्यांचा मुलगा यांच्यावर स्वत:च्याच दुकानात चोरी केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ओंकार कृषी केंद्राचे मालक संजय राजाराम पावावर आणि त्यांचा मुलगा ओंकार संजय पवार यांच्यावर हा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने करकंब परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून करकंब येथील हे कृषी केंद्र गाजत आणि चर्चेत आहे आणि आज याला वेगळेच वळण लागले आणि तालुक्यात याची चर्चा सुरु झाली आहे. करकंब आणि बार्डी गावातील काही शेतकऱ्यांनी करकंब येथील ओंकार कृषी केंद्रातून तणनाशक खरेदी केले होते. त्यांनी द्राक्षबागेची छाटणी करण्यापूर्वी फवारणी केली परंतु त्यांची बाग फुटलीच नाही. शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले त्यामुळे यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी खात्याकडे याबाबत तक्रार केली होती.
सदर तक्रारीवरून कृषी अधिकारी यांनी कार्यालयातील तालूका तक्रार निवारण पथकासह किटकनाशक अधिनियम १९६८, १९७१ आणि किटकनाशक नियंत्रण आदेश १९८६नुसार ५ नोव्हेंबर २२ रोजी या ओंकार कृषी केंद्राची आणि गोदामाची तपासणी केली होती. प्रयोगशाळेत तपासनीस पाठविण्यासाठी ग्लायस्टॉप तणनाशकाचे नमुने घेण्यात आले तसेच दुकानात आणि गोदामात असलेल्या सर्व मालाचा पंचनामा करण्यात आला. कृषी केंद्राच्या मालकाचा मुलगा ओंकार पवार यांचे समक्ष हा पंचनामा करून या दुकानाचे शटरचे कुलूपांना व गोडाऊनचे कुलूपांना सील ठोकले होते. सुरक्षेच्या हेतूने त्याच्या कुलूपाच्या च्याव्या ओकार पवार यांचे ताब्यात दिल्या आणि सर्व कायदेशीर बाबी पूर्ण होईपर्यंत आणि लेखी परवानगी मिळेपर्यंत कृषी केंद्र न उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यानंतर जिल्हा कृषी कार्यालयात या प्रकरणी सुनावणी झाली आणि पुढील आदेशापर्यंत ओंकार कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला. त्यामुळे कृषी केंद्रात असलेल्या मालाची विक्री करण्यावर देखील बंधने आली. विक्री परवाना नसलेल्या कंपनीचे तणनाशक या कृषी केंद्रात आढळून आलेले असल्यामुळे करकंब पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मात्र सदर कृषी केंद्राचे सील तोडून मालकानेच दुकानातील आणि गोदामातील माल चोरून नेला असल्याबाबत काही शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाला माहिती दिली. शासनाने दुकानाला सील केले असल्यामुळे दुकानाच्या मालकालाही ते उघडता येत नाही. येथे तर सील तोडून दुकानातील आणि गोदामातील माल मालकानेच चोरून नेल्याची माहिती अमर सदाशीव व्यवहारे, बबन प्रभाकर दुधाळ आणि रियाज बाळू कोरबू यांनी कृषी विभागाला दिली.
दुकानाचे व गोडाऊनचे कुलूपाचे सील तोडून सदर दुकानातील व गोदामातील कृषी निवीष्ठा माल मालकाने चोरून नेला आहे असे कळविल्याने कृषी विभागाच्या पथकाने समक्ष पाहणी केली. त्यांना सील तोडले असल्याचे आणि दुकान, गोदामातील माल नसल्याचे दिसून आले. सदर दुकानाची व गोडाऊनची पाहणी केली असता सदर दुकानाचे व गोडाऊनचे कूलूपाचे सील पंच व साक्षीदार यांचे समक्ष पाहणी केली असता सदर कुलूपाचे सील तूटलेले दिसून आले. त्यानंतर सदर दुकानातील कृषी निविष्ठा मालाची पाहणी करून आणखी एकादा फेर पंचनामा केला असता काही माल गायब असल्याचे दिसून आले सदर दुकान आणि गोदामातील एकूण १९ कंपनीचे ३ लाख ३१ हजार ४७३ रुपये किंमतीची औषधे चोरीस गेली असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी सरडे यांनी करकंब पोलिसात दिली. दुकानाचे मालक संजय राजाराम पवार व मुलगा ओंकार संजय पवार यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता, कलम १८८,४५४,४५७, ३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ओंकार कृषी केंद्राच्या मालकावर आणि त्यांच्या मुलावर त्यांचाच मालकीच्या दुकानात चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने करकंब परिसरात खळबळ उडाली असून हा चर्चेचा विषय बनला आहे. (The owner of the agricultural center has been accused of stealing from his own shop) मालक असले तरी प्रशासनाने तपासणी करून सील केलेले दुकान आणि गोदाम उघडण्याचा मालकाला कायदेशीर अधिकार उरत नाही त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !