शोध न्यूज : पंढरपूर येथील एका नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये परीक्षा देत असतानाच एका छोट्या ९ वर्षे वयाच्या मुलीचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला असून या घटनेने पंढरीत प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.
पंढरपूर येथील अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये आज ही वेदनादायक घटना घडली. सकाळी अनन्या प्रकाश भादुले ही ९ वर्षे वयाची चिमुकली विद्यार्थिनी शाळेत पोहोचली होती. प्राप्त माहितीनुसार आज तिची परीक्षा सुरु होती आणि याचवेळी बाकावर बसलेली असताना अचानक तिला काही त्रास जाणवू लागला. अरिहंत स्कूलच्या शिक्षकांच्या लगेच ही बाब लक्षात आली आणि त्यांनी अत्यंत तातडीने अनन्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु उपचारापूर्वीच या छोट्या विद्यार्थिनीने अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर मात्र अरिहंत इंग्लिश स्कूलच्या शिक्षकात आणि विद्यार्थ्यात एकच अस्वस्थता पसरली. शाळेत एकमद सुन्न वातावरण होऊन गेले तर अनन्याच्या परिवाराला हा फार मोठा धक्का बसला आहे. शहरात या घटनेची माहिती होताच प्रत्येकजण हळहळ व्यक्त करू लागला आहे.
अनन्या ही बालिका गेल्या दोन चार दिवसांपासून आजारी होती अशीही माहिती मिळत आहे. पालकांनी तिला आज शाळेत न जाण्याबाबत सांगितले होते परंतु ती शाळेत गेली होती असे देखील सांगण्यात येत आहे. (Pandharpur English School student dies while giving exam) या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटनेने पंढरपूर शहर सुन्न झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !