शोध न्यूज : भिकारी बनून महिलांनी तब्बल दोनशे तोळे सोने लुटले आणि पोलिसांनी शेतकरी बनून या चोरट्या महिलांना पकडण्यात यश मिळाले असून या प्रकरणात दोन सराफ व्यावसायिकांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
चोऱ्या, दरोडे असे गुन्हे नेहमीच होत असतात पण काही गुन्हे हे चर्चेचे आणि थक्क करणारेही असतात. असाच बहुचर्चित ठरलेला पुण्यातील गुन्हा हा थक्क करणारा ठरला आहे. महिलांनी तब्बल तीन महिने रेकी करून भरदिवसा घरफोडी केली आणि बाणेर रोड-औंध येथील अनामिका बंगला क्रमांक १७, सिंध हौसिंग सोसायटीत घडलेला हा गुन्हा पोलिसांसमोर देखील आव्हान उभे करून गेला. तब्बल २०५ तोळे सोने, चार तोळे हिर्याचे दागिने, चांदी, प्लॅटिनमचे दागिने, रोकड आणि विदेशी चलन एवढे मोठे घबाड या महिलांनी लंपास केले होते. भिकारी बनून वावरणाऱ्या या महिलांनी एकाच घरात रेकी करून मोठी चोरी केली होती. याप्रकरणी पुण्याच्या चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या चोरीचा छडा लावणे पोलिसांसाठी एक आव्हानात्मक काम बनले होते परंतु पोलिसांनी देखील हे आव्हान पेलले आणि चोरट्या महिलांच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या.
महिला जशा भिकारी बनून आल्या तसे पोलिसांनी देखील वेषांतर केले आणि शेतकरी बनून या चोरीचा छडा लावला. घरातील लोक जेवणासाठी म्हणून बाहेर गेले होते आणि या संधीचा फायदा उठवत भरदिवसा तब्बल ६६ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज घेवून चोरटे पसार झाले होते. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीने नागरिकांना देखील हादरा बसला होता आणि पोलीस चक्रावले होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास सुरु केला आणि परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मागोवा घेतला जाऊ लागला. बीड आणि जालना जिल्ह्यातील महिलांच्या टोळीने ही चोरी केली असल्याचा सुगावा पोलिसांना त्यांच्या तपासात लागला आणि पोलिसांनी आपला मोर्चा बीड, जालना जिल्ह्याकडे वळवला. बीड जिल्ह्यात गेल्यावर पोलिसांना अनु पवन आव्हाड ऊर्फ अनु राहुल भोसले हिच्याबद्धल माहिती मिळाली. पोलिसांनी वेषांतर केले आणि शेतकरी बनून आरोपीचा माग काढत राहिले.
पोलिसांनी तब्बल आठ दिवस वेषांतर करून शोध घेणे सुरु ठेवले आणि त्यांना गेवराई तालुक्यातील राजापूर फाटा येथील पारधी वस्तीवर राहणारी अनु पवन आव्हाड ऊर्फ अनु राहुल भोसले हिचा शोध लागला. तिला ताब्यात घेतल्या नंतर तिच्याकडून तिची आणखी एक सहकारी १९ वर्षे वयाची तरुणी खुशबू दिलीप गुप्ता ऊर्फ खुशबू कठाळू काळे हिच्याबाबत माहिती मिळाली. जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे ती राहत असल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवला पण पोलिसांच्या येण्याचा सुगावा लागताच तिने पळ काढला. पोलीसानीही तिचा पाठलाग केला आणि जेरबंद केले. या महिलांच्या टोळीतील इतर महिला या फरार झाल्या असल्या तरी या दोघींकडून चोरीची माहिती पोलिसांना मिळाली.
चोरीतील मालाची पोलिसांनी या दोघींकडे चौकशी केली असता त्यांनी काही ऐवज ठाणे येथील सराफांना विकला असल्याची माहिती त्यांनी दिली त्यामुळे पोलिसांनी पुन्हा आपला मोर्चा सराफांच्या दिशेने वळवला. (Robbed as a beggar, caught by the police as a farmer) पोलिसांनी महावीर धनराज चपलोत (वय ३५, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व), मदन रामेश्वर वैष्णव (वय २६, रा. शिवाजीनगर, कळवा, ठाणे) या दोघा सराफांनाही अटक केली. एवढी मोठी घरफोडी करणाऱ्या सर्व महिलाच असून खुशबू दिलीप गुप्ता ऊर्फ खुशबू कठाळू काळे, अनु पवन आव्हाड ऊर्फ अनु राहुल भोसले यांना अटक करण्यात आली आहे तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. त्याच्यांकडून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ४३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. टोळीतील इतर दोन महिला फरार असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. या महिलांनी सदर घराची तब्बल तीन महिने रेकी केली होती.
भिकारी बनून वावरत असलेल्या या महिलांनी सदर व्यावसायिकाच्या घरी चोरी करण्यासाठी पुरेसे नियोजन केले होते. बंगल्याची रेकी करण्याची जबाबदारी एक महिलेवर देण्यात आली होती आणि त्यानुसार ही महिला बंगल्यावर पाळत ठेवत राहिली. घरातील लोक कधी बाहेर जातात, किती वेळाने परत येतात याचीही बारकाईने माहिती घेतली गेली होती. या बंगल्यातील लोक रविवारी दुपारी बाहेर जात असल्याचे या महिलांच्या लक्षात आलेले होते आणि तीच संधी साधून त्यांनी ही चोरी केली होती. बंगल्याच्या खिडकीतून या महिलांनी आत प्रवेश केला आणि बंगला 'साफ' केला. पोलीसानीही कौशल्याने वेषांतर करून या चोरीचा छडा लावला. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होऊ लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !