BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जाने, २०२३

विठ्ठल मंदिराचा पत्ता विचारणे भाविकाला पडले महागात !

 


शोध न्यूज : विठ्ठल मंदिराचा पत्ता विचारणे देखील भलतेच महागात पडले असून पंढरपूर येथे एका भाविकाला निर्जन स्थळी नेऊन लुटण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. 


पंढरपूर हे अध्यात्मिक क्षेत्र आहे तशी पंढरीला गुन्हेगारी पार्श्वभूमीही मोठी आहे. टाळ मृदुंगाचा निनाद आणि हरीनामाचा गजर जिथे ऐकायला मिळतो तिथेच तलवारीचा खणखणाट ऐकायला मिळत होता. भरदिवसा नंग्या तलवारी नाचत मुडदे पाडले जात होते, गेल्या काही वर्षात हे वातावरण बदलले असले तरी चोऱ्या आणि भाविकांना लुटण्याचे प्रकार मात्र अद्यापही थांबलेले नाहीत. चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांचे कपडे देखील असुरक्षित असतात, जमेल तशा पद्धतीने भाविकांना लुटण्याचा प्रकार होत असतोच पण आता एक नवा फंडा समोर आला असून पत्ता विचारणाऱ्या भाविकाला निर्जन स्थळी नेत लुटण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील वनाळी येथील तरुण भाविक विनायक बाबुराव वाडकर हे विठ्ठल रखुमाई दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले होते. खाजगी वाहन घेऊन ते पंढरपूर येथे पोहोचले आणि त्यानंतर पायी चालत ते मंदिराकडे निघाले होते. भल्या पहाटे ते मंदिराच्या दिशेने जात असताना मंदिरापासून जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर दोन भामट्याने त्यांना गाठले. पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती आणि याचाच फायदा भामट्यांनी उठवला. परगावचे भाविक असल्याने त्यांना विठ्ठल मंदिर नेमके कुठे आहे हे लक्षात येत नव्हते त्यामुळे वाडकर यांनी या दोघांनाच पत्ता विचारला आणि तेथेच त्यांचा घात झाला. 


दुचाकीवरून आलेल्या दोघांना भाविकाने 'विठ्ठल मंदिर येथून जवळ आहे का ?' अशी विचारणा केली. त्यावेळी या दोघांनी, 'आम्ही मंदिराकडे निघालो आहोत, चला तुम्हाला सोडतो' असे म्हणत दुचाकीवर दोघांच्या मध्ये बसवले आणि थेट निर्जन स्थळी नेले. निर्जनस्थळी गेल्यावर तेथे भाविक वाडकर याना जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याजवळची ३० हजार रुपयांची रक्कम त्यांनी घेतली.(A devotee was robbed early in the morning at Pandharpur.) वाडकर याना निर्जन स्थळीच सोडून दोन्ही चोरटे दुचाकीवरून तेथून पसार झाले. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाविकांची सुरक्षा हा विषय पुन्हा ऐरणीवर येताना दिसून आला आहे. 


दोघांना अटक !

सदर प्रकरणी पोलिसांनी तातडीने शोध घेत दोघांना अटक केली आहे. दुचाकीचा अर्धवट क्रमांक भाविकाने पाहिला होता. त्या आधाराने पोलिसांनी शोध घेतला आणि दोघांना जेरबंद केले. महादेव उर्फ सतीश हणमंत सगर आणि किरण प्रकाश वाडेकर (दोघे रा. पंढरपूर) यांना अटक करण्यात आली आहे. या तपासाबद्धल पोलिसांचे कौतुक होत आहे.



     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !