BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जाने, २०२३

शिंदे गटातील आमदारांचा घातपात ? घेतले माजी मंत्र्यांचे नाव !

 


शोध न्यूज : शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांचा अपघात हा घातपात असण्याचा संशय व्यक्त करीत माजी मंत्री आणि कदम यांची वडील रामदास कदम यांनी थेट ठाकरे गटाच्या माजी मंत्र्यांचे नाव घेतले आहे. 


शिवसेनेतून फुटून गेलेल्या चाळीस आमदारांत समावेश असलेले योगेश कदम यांचा काल रात्री मुंबईला जाताना कशेडी घाटात चोळई हद्दीत अपघात झाला होता. या अपघातातून योगेश कदम बचावले परंतु हा अपघात नसून घातपात असावा असा सूर कदम यांच्या कार्यकर्त्यांनी लावला होता. तशा चौकशीचीही मागणी होत होती. त्यानंतर मात्र आ. योगेश कदम यांचे वडील आणि शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले रामदास कदम यांनीच घातपाताची शंका व्यक्त करून थेट शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री अनिल परब यांचे नाव घेतले आहे त्यामुळे राजकारणात वेगळीच खळबळ उडाली आहे.  हा घातपात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे आणि आ. कदम यांना आयुष्यातून संपविण्याचा प्रयत्न झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या संशयामुळे या अपघाताला वेगळेच वळण मिळू लागले आहे. 


आ. योगेश कदम हे खेडकडून मुंबईकडे जाताना हा अपघात झाला. यावेळी आ. कदम यांच्या गाडीच्या पुढे आणि मागेही पोलिसाची गाडी होती तरीही डंपरने नेमकी योगेश कदम यांचायचं गाडीला धडक दिली हे संशयास्पद असून त्यामुळे घातपाताची शंका व्यक्त करण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर धडक देणारे वाहन पलटी झाले परंतु चालक मात्र तेथून फरार झाला आहे त्यामुळे हा अपघात नसून घातपात असावा अशी शक्यता कदम यांच्या कार्यकर्त्यांनीही व्यक्त केली आणि एकूण घटनेची सखोल चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली.  या संशयाची जोरदार चर्चा सुरु झाली असतानाच आ. योगेश कदम यांचे वडील आणि शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनीही संशय व्यक्त करून थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नेते अनिल परब यांच्या नावाचा  उल्लेख केला आहे.


शिवसेना ठाकरे गटातील जेष्ठ नेते आणि माजी मंत्री असलेले अनिल परब यांचेच नाव रामदास कदम यांनी घेतले. 'अनिल परब यांच्यासारख्या लोकांनी योगेश कदम यांना राजकारणातून संपविण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला असून आता त्यांना आयुष्यातूनच उठवविण्याचा प्रयत्न होता काय ? असा संशय निर्माण होतोय, ज्यांनी यापूर्वी योगेश कदम यांना राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच आपला संशय आहे.' असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.  "मातोश्री' च्या आशीर्वादाने अनिल परब यांच्यासारख्या मंडळीनी हे कृत्य केल्याचा आपला संशय असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. (Suspicion regarding MLA Yogesh Kadam's accident, Anil Parab's name) पुढे मागे पोलिसाची गाडी असताना डंपर मधल्या गाडीलाच कसा ठोकतो ? पुढे फरफटत नेतो, थोडे काही चुकले असते तर कदम यांची गाडी दरीत गेली असती. त्यामुळे हे सुनियोजित कुणी केले आहे की काय असा आपला संशय असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे. 


आ. कदम यानाही शंका 

आमदार योगेश कदम यांनीही या अपघाताबाबत शंका व्यक्त केली असून हा अपघात नॉर्मल वाटत नाही. आपण पोलिसांना जी माहिती द्यायची ती सगळी दिली आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा याची चौकशी करतील. आपल्याला असणाऱ्या शंका आपण पोलिसांना कालच सांगितल्या आहेत. असे सांगत आ. कदम यांनी देखील या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे.  




 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !