भेसळ नव्हे, हे तर नकली दूध !
शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणी आणखी एकाला पोलिसांनी वेड्या ठोकल्या असून मास्टर माइंड मेहता मात्र फरार झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पंढरपूर तालुक्यात पांढऱ्या दुधाचा काळा धंदा सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील तीन भेसळखोराना पोलिसांनी अटक केली आहे. दुधात केमिकल मिसळले जात असल्याचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर घराघरात मोठा धक्का बसला आहे. दुधात घातक केमिकलची भेसळ करणाऱ्या एका टोळीलाच पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले असून यात पंढरपूर तालुक्यातीलच काही व्यक्ती कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील एका दूध डेअरीकडे निघालेले केमिकल जप्त करण्यात आले आहे. वाहनात भरून केमिकलचे तब्बल मोठे चौदा कॅन आढळून आले होते.
सदर प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील वृन्दावनम सोसायटी, रो हाऊस क्र. ३८ येथे राहणारे निलेश बाळासाहेब भोईटे, फुलचिंचोली येथील काळे मळा येथे राहणाऱ्या परमेश्वर सिद्धेश्वर काळे आणि टाकळी रोडवरील गणेश नर्सरीजवळ राहणाऱ्या गणेश हनुमंत गाडेकर या तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. दुधाचे कॅन आणि पांढऱ्या रंगाच्या लिक्विडबाबत चौकशी केली असता तिघांकडून माहिती मिळाली आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील समीर शुभाष मेहता यांच्याकडून दुधात भेसळ करण्यासाठी हे लिक्विड आणण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले होते त्यानुसार पोलिसांनी पुढील हालचाली केल्या आहेत.
हे प्रकरण वाटते तेवढे किरकोळ नसून याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांना वाटली असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. वडगाव निंबाळकर येथील मेहता याच्या घरी पोलिसांनी धाड टाकून एक मशीन सील केली आहे तर मेहताकडे काम करीत असलेल्या स्वप्नील राजेंद्र गायकवाड याला पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे. पंढरपूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करीत वडगाव गाठले आणि मेहता याच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरी आढळलेले द्रावण बनविण्याचे मशीन जप्त करून तेथे काम करणाऱ्या गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकरणातील ही चौथी अटक असून आणखी किती मासे पोलिसांच्या जाळ्यात सापडतात ते पुढील काही काळात दिसणार आहे.
वडगाव निंबाळकर येथील मेहता याच्याकडून दुधात भेसळ करण्यासाठी अशा प्रकारचे घातक द्रावण आणखी कुणाकुणाला पुरवले जात होते याची उकल गायकवाड याच्याकडून करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. पंढरपूर तालुक्यात हे प्रकरण उघडकीस आल्यावर गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील मास्टरमाईंड मेहता हा मात्र पसार झाला आहे. त्याच्याही हातात पोलीस लवकरच बेड्या ठोकतील परंतु अशा प्रकारची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अत्यंत घातक प्रकार !
सदर प्रकार दुधात भेसळ करण्याएवढा साधा नसून हा अत्यंत घातक प्रकार आहे. मेहता यांच्याकडील रासायनिक द्रावण पाण्यात टाकले की दुधासारखा घटक तयार होतो आणि हे ओळखणे देखील अशक्य असते. मेहता यांच्याकडील हे द्रावण सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील नेले जात असल्याची चर्चा असल्याने याची मोठी व्याप्ती समोर येण्याची शक्यता आहे. या द्रावणापासून दूध तयार करून ते संघाना देखील पुरवले जात असून हा प्रकार अत्यंत अपायकारक आहे. फलटण पोलिसांनी काही वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील रॅकेट उद्ध्वस्त केले होते आणि यावेळी देखील मेहता याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
अनेकांना हादरा !
पंढरपूर तालुक्यातील प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांना हादरा बसलेला असून मागच्या वेळी बारामती तालुक्यात हे रॅकेट उघडकीस आल्यानंतर दूध संकलन घटले होते. द्रावणापासून दूध तयार करून विकले जात होते आणि आता पुनः तसेच प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे असे दूध तयार करून विकणारे अनेकजण धास्तावले असून कारवाईचा फास आपल्यापर्यंत पोहोचेल या भीतीने काही डेअरीचालकांचे धाबे दणाणले आहेत. (Another person arrested in Pandharpur milk adulteration case) जनतेतून मात्र या कारवाईचे स्वागत होत असून घराघरात विष पोहोचविणाऱ्याना आयुष्यभराची अद्दल घडेल अशीच शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !