शोध न्यूज : उजनीचा उजवा कालवा फुटल्याने मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील तीनशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून आता नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामे आणि नुकसान भरपाईची प्रतीक्षा करू लागले आहेत.
काल उजनीचा उजवा कालवा मोहोळ तालुक्यातील पाटकूल गावाजवळ फुटला आणि शेत शिवारात एकच हाहा:कार उडाला. शेतीसाठी पाणी सोडले असल्यामुळे शेतकरी समाधानी होते परंतु अचानक पहाटेच्या वेळी कालव्याला भगदाड पडले आणि शेतकरी बांधवांच्या काळजाचा ठोका चुकला. कालव्यातील प्रवाहित पाण्याला वेग असल्याने भगदाड पडताच कालव्यातील पाणी शेतशिवारात वेगाने घुसले. यामुळे शेतीची माती तर वाहून गेलीच पण विद्युत मोटारीसह उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. डोळ्याने हे चित्र पाहत असतानाही शेतकरी बांधवास काहीही करता येत नव्हते. कालवा कसा फुटला यावर नेहमीची छापील उत्तरे दिली जातीलही पण शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण ? असा प्रश्न कायमचा उरणार आहे. कालव्याच्या पाण्याचा वेग मोठा असल्यामुळे मोहोळ तालुक्यात तो फुटला असला तरी मोहोळसह पंढरपूर तालुक्यातील शेतजमिनीचे देखील नुकसान या पाण्याने केले आहे.
मोहोळ तालुक्यातील सुमारे दोनशे हेक्टर तर पंढरपूर तालुक्यातील सुमारे शंभर हेक्टर उभ्या पिकांचे नुकसान या घटनेने केले आहे. पाटकूल येथे हा कालवा फुटला असला तरी पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली परिसरातून हे पाणी ओढ्याला जाऊन मिळाले. ओढ्याच्या पात्रापेक्षा अधिक पाणी असल्यामुळे ओढ्याच्या बाहेर येत या पाण्याने पंढरपूर तालुक्यातील सुमारे शंभर हेक्टर क्षेत्रात या पाण्याने धुमाकूळ घातला आणि जवळपास साडे तीनशे शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट केली आहेत. मोहोळ तालुक्यातील दोनशे एकर क्षेत्र या पाण्याखाली गेले आणि विविध प्रकारचे मोठे नुकसान केले आहे. विहिरी, विद्युत मोटारी आणि शेतजमीन यांचेही या पाण्याने मोठे नुकसान केले आहे. ही घटना घडल्यानंतर प्रशासन देखील सतर्क झाले आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घटनास्थळाची पाहणी करीत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Huge loss of agriculture due to bursting of Ujani Canal) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी देखील संवाद साधत जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली आहे.
कालवा कशामुळे फुटला याची ठराविक उत्तरे पाटबंधारे विभागाकडे असतात. कधीही अशा घटना घडल्या की उंदीर, घुशी यांना पुढे केले जाते. वास्तविक हा कालवा ५० वर्षांपूर्वीचा असून त्याची देखभाल दुरुस्ती वेळेवर होताना दिसत नाही. भरावात झाडी वाढलेली असते परंतु त्याकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. उंदीर, घुशी यांच्यामुळे भरावाला अनेक ठिकाणी छिद्रे पडलेली असतात. कालव्याला भगदाड पडण्याची ही काही पहिली घटना नसून पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची बारकाईने पाहणी करणे देखील तितकेच आवश्यक बनले आहे. पाणी तर वाया जातेच पण शेतकऱ्यांना मोठा फटका अशा घटनामुळे सहन करवा लागतो. घटनास्थळाला जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जलसंपदा विभागाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता धीरज साळे, मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे, पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेलेकर आदींनी देऊन पाहणी केली आहे आणि तत्काळ मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. आता शेतकरी पंचनामे आणि शासकीय मदत याच्या प्रतीक्षेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !