शोध न्यूज : बांधकाम व्यावसायिक ठेकेदाराकडून फसवणूक झाल्याबाबत वृद्ध महिलेने महिला आयोग तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षात सगळीकडेच बांधकामे वाढली असून जिकडे तिकडे बांधकाम सुरु असताना दिसत असते. नागरिकांची ही अत्यावश्यक गरज बनली असताना बांधकाम व्यवसायाच्या आडून गरजू नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार देखील वाढला आहे. प्रारंभी सगळ्या गोष्टी मान्य करून आणि कमी खर्चात बांधकाम पूर्ण करण्याची हमी दिली जाते परंतु नंतर मात्र बांधकाम करू इच्छिणाऱ्याला वेठीला धरले जाते. बांधकाम पूर्ण करणे जिकीरीचे होऊन जाते आणि अर्धवट बांधकाम सोडताही येत नाही अशी परिस्थिती होते आणि उघड्या डोळ्यांनी फसवणूक होताना पाहण्याची वेळ येते. पंढरपूर शहरात देखील अशी काही लबाड मंडळी आहेत आणि त्यांचा अनेकांना त्रास झाला आहे.
पंढरपूर येथे सहयोगनगरमध्ये राहणाऱ्या ७३ वर्षीय उषा जगन्नाथ डोंबाळी आणि त्यांचे चिरंजीव जेष्ठ नागरिक यशवंत डोंबाळी यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. विशेष म्हणजे ही तक्रार पोलिसांसह राज्य महिला आयोगाकडे देखील करण्यात आली आहे. पंढरपूर येथील एका बांधकाम व्यावसायिकास घराच्या बांधकामाचा ठेका दिला होता परंतु त्यांनी अडवणूक करून फसवणूक केल्याची त्यांची तक्रार आहे. बांधकाम करण्यापूर्वी सुरूवातीला प्रति चौ. फूट १ हजार ४०० रुपये या प्रमाणे करारपत्र करून घर बांधकामाचे कंत्राट दिले होते . परंतु ठेकेदाराने 'परवडत नाही' म्हणून प्रति चौ. फूट १ हजार ५०० रुपये प्रमाणे मागणी करून पुन्हा करारपत्र करून घेतले .प्रत्यक्षात मात्र ठेकेदाराने १५०० चौरस फुट दराप्रमाणे बांधकाम साहित्य वापरले नाही आणि फसवणूक केली, बांधकाम गुणवत्ततेचे केलेले नाही .तसेच संपूर्ण बांधकामाची रक्कम देवूनही आमचे बांधकाम अपूर्ण स्थितीत सोडून गेले आहेत असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
आपण वृद्ध असून आपला मुलगा यशवंत डोंबाळी यांना मधुमेहामुळे व्यवस्थित दिसत नाही. ठेकेदाराने आमचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक केली आहे. बांधकामात आणि साहित्य वापरात देखील फसवणूक झाली असून संबधित ठेकेदार बांधकाम व्यावसायिक यांचायाविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. (Cheating by builders; Complaint to Police, Women's Commission) जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे देखील त्यांनी तक्रार केली असून आपली फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. आधी करारपत्र केले असतानाही आणि आगाऊ रक्कम दिली असतानाही नंतर रक्कम वाढवून मागण्यात आली.
करारपत्रात तसे नमूद नसतानाही रक्कम वाढवून मागितली आणि ती न दिल्यास आधी दिलेली रक्कम बुडेल असे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा नव्याने करारपत्र करण्यात आले. अचानक बांधकाम थांबविले गेले त्यामुळे मानसिक त्रास सहन करून नवे करारपत्र तयार केले गेले. ठेकेदाराने संपूर्ण रक्कम घेतली असतानाही कराराप्रमाणे बांधकाम केले नाही तसेच काही कामे अर्धवट ठेवली गेली आहेत त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्या तक्रारीचा तपास आणि चौकशी फक्त आपल्या कार्यालयाकडूनच व्हावी, तसेच बांधकाम तज्ञांकडून प्रत्यक्ष तक्रारीची पडताळणी होऊन संबधितावर गुन्हा दाखल होऊन मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !