BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ जाने, २०२३

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाला ठार करण्यासाठी पाच लाखाची सुपारी !




शोध न्यूज : तुमच्यामुळे माझा मुलगा सरपंच झाला नाही, आता तुमच्या कुटुंबात कुणी जिवंत राहणार नाही अशा प्रकारची धमकी एका ऊस तोडणी मुकादामाच्या कुटुंबाला आल्याने एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण तयार झाले आहे.  


ग्रामपंचायत निवडणूक नेहमीच चुरशीची होत असते परंतु यावेळी झालेल्या निवडणुकीतील चुरस ही काहीशी वेगळीच होती. यावेळी सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने चुरस वाढली होती आणि त्याचा परिणाम म्हणून आमिषे वाढली होती, धमक्या, दमदाटी असे प्रकारही घडले होते. एवढेच काय, निवडणुकीत विजय मिळावा म्हणून लिंबू, मिरच्या, बाहुल्या असा अंधश्रद्धेचा देखील वापर करण्यात आल्याच्या लाजिरवाण्या घटनाही यावेळी समोर आल्या होत्या. वाजत गाजत निवडणूक संपली, सरपंच, सदस्य निवडून आले पण त्याचे कवित्व काही केल्या संपत नाही. पराभूत झालेल्या उमेदवारांनी निवडणुकीत वाटलेले पैसे देखील परत घेतल्याच्या चर्चा रंगत असताना आता थेट कुटुंबाला ठार मारण्याची सुपारी दिल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नांदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 


नांदा येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली आहे आणि या पार्श्वभूमीवर दत्तात्रय गहिनीनाथ औटे यांना धमकीचे एक पत्र मिळाले आहे. औटे हे ऊसतोड मुकादम म्हणून काम करतात. त्यांना पोष्टाने एक पाकीट मिळाले असून हे पाकीट उघडताच त्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्यासाठी पाच लाखाची सुपारी दिल्याचा उल्लेख या पत्रात आहे. तुमच्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत माझा मुलगा सरपंच होऊ शकला नाही. आता संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आली आहे असा मजकूर या पत्रात असल्याने ग्रामपंचायत निवडणूक कुठल्या वळणावर पोहोचली आहे हेच दिसून येत आहे. हे पत्र औटे यांना मिळाल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.  या पत्राने गावात तर भीतीचे वातावरण आहेच पण संपर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. 


ग्रामपंचायत निवडणूक ही चुरशीची आणि प्रतिष्ठेची केली जात असताना आता थेट अशा प्रकारच्या धमक्या देखील देण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर अनेक ठिकाणी भांडणे, मारामाऱ्या, हल्ले असे प्रकार झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर हे धमकीपत्र गंभीरपणे घेतले गेले असून आष्टी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे. (Gram panchayat election, family threatened to kill) लोकशाही प्रक्रियेत निवडणुकीत हार जीत असते आणि दोन्ही घोष्टी मोकळ्या मनाने स्वीकारायच्या असतात. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र तसे घडत नसल्याचेच समोर येताना दिसत आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !