BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ जाने, २०२३

दारूबंदी विभागाच्या जवानाला लाच प्रकरणी अटक !




शोध न्यूज : आरोपीला जामिनासाठी मदत करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानाला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून या विभागाचा चेहरा अखेर समोर आला आहे.


दारूबंदीसाठी शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत केला आहे परंतु गावागावात आणि वाडी वस्त्यावर अवैध दारूचा  महापूर आलेला सगळेच उघड्या डोळ्यांनी पहात असतात. गेल्या काही दिवसांपासून हा विभाग मोठ्या चर्चेत आला आहे. ढाबा अथवा हॉटेल येथे मद्यविक्री अथवा मद्यप्राशन करण्यास कायद्याने मनाई आहे. अशा ठिकाणावर छापे टाकून मोठ्या प्रमाणात हॉटेल मालक आणि ग्राहक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यात हॉटेल मालक आणि  ग्राहकांना देखील न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली आहे. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असतानाच उत्पादन शुल्क विभागातील एका कर्मचाऱ्यास लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे त्यामुळे उत्पादन शुल्क विभागात नेमके काय चालते हेच दिसून आले आहे. या विभागाबाबत नेहमीच चर्चा सुरु असते परंतु आता या कारवाईमुळे अशा चर्चांना बळ मिळाले आहे. 


दारूबंदी अधिनियामान्वये दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी मदत करतो म्हणून आरोपीकडून तब्बल तीस हजार रुपयांची लाच मंगल गुलाब तांबोळी या जवानाने मागितली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकात जवान या पदावर नेमणुकीस असलेला मंगल तांबोळी हा सोलापूर येथे सैफुल परिसरात राहतो. त्याने सोलापूर येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळण्यास मदत करण्याचे सांगून ३० हजार रुपयांची लाच मागितली. यात तडजोड होऊन लाचेची रक्कम २० हजार रुपये ठरली. तक्रारदार यांना जामीनाच्या अनुषंगाने केलेल्या सहकार्याचा मोबदला म्हणुन ३०,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २०,०००/- रुपये स्विकारण्यास संमती दिली. प्रत्यक्षात तक्रारदारास अशी लाच देणे मान्य नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार केली आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली.


सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवक मंगल गुलाब तांबोळी याला या प्रकरणी अटक केली आहे. (Excise Department jawan arrested in bribery case) राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथकातील जवानालाच अशा प्रकारे अटक झाल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !