BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ जाने, २०२३

पोलिसांना गंडा घालणाऱ्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्यास बेड्या !

 


शोध न्यूज : पोलिसांची बदली करून देण्याचा बहाणा करून पोलिसांनाच लुटू पाहणाऱ्या त्या तोतया पोलीस अधिकाऱ्यास पोलिसांनी कौशल्याने पकडून बेड्या ठोकल्या आहेत. अनेकांची फसवणूक केल्यानंतर आता त्याला तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. 


गुन्हेगार हा पोलिसांपासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो. चुकीनही पोलिसांचा सामना होऊ नये अशी त्याची इच्छा असते आणि पोलिसांना सापडणार नाही अशा पद्धतीने त्याची गुन्हेगारी सुरु असते. अर्थात गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलीस एक ना एक दिवस त्याची कॉलर पकडतातच ! कुठलाही गुन्हेगार हा पोलिसांपासून दूर कसे राहता येईल याची सतत काळजी घेत असतो पण एका भामट्याने पोलिसांनाच गंडा घालण्याचा धंदा उघडला आणि पोलिसांना टोप्या घालत कमाई करीत राहिला. एका पोलिसाला मात्र त्याचा संशय आला आणि हा पोलीस अधिकारी नसून कुणी भामटा आहे याची जाणीव झाली. अत्यंत हुशारी दाखवत या पोलिसाने त्याला वठणीवर आणत बेड्या ठोकून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. पुण्यासारख्या शहरात पोलिसांनाच गंडा घालण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला आहे.


"हॅलो, मी पोलीस निरीक्षक पाटील बोलतोय, तुमची अथवा तुमच्या ओळखीच्या कुणाची बदली करायची असेल तर सांगा... मी बदली करून देतो" असा फोन अमित कांबळे नावाचा एक तोतया पोलिसांनाच करीत होता. पोलीस कर्मचाऱ्यांना बदली हवी असते परंतु अनेकदा त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली होत नाही त्यामुळे ते अडचणीत असतात. कुठून तरी आपली बदली आपल्याला हव्या त्या ठिकाणी व्हावी ही त्याची अपेक्षा असते. त्यांच्या याच परिस्थितीचा गैरफायदा हा कांबळे उठवत होता. पुण्याच्या गुन्हे शाखेतील रुस्तुम मुजावर या पोलीस कर्मचाऱ्यास असाच फोन आला आणि अमित कांबळे याचा घडा भरला गेला. 


पोलीस कर्मचारी मुजावर याना फोन करून आपण पोलीस निरीक्षक पाटील बोलतोय असे सांगितले आणि तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाची बदली करायची असेल तर सांगा असे त्याने म्हटले. बदलीसाठी पैशाची मागणीही त्याने केली. त्याच्या बोलण्यावरून हा कुणी पोलीस निरीक्षक नसावा असे मुजावर याना वाटून गेले. रात्री पुन्हा या तोतयाने मुजावर याना फोन केला आणि मला किती वेळ थांबवता ? असा सवाल करीत आपण पोलीस आयुक्तालयातील गेट क्रमांक तीन वर थांबलो आहोत असे त्याने सांगितले. आता मात्र मुजावर यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले याना याची माहिती दिली. 


फोन करणाऱ्या या पोलीस निरीक्षक पाटील याना भेटण्यासाठी मुजावर हे थेट पोलीस आयुक्तालयाच्या गेट क्रमांक तीन वर पोहोचले. हा भामटा तेथे वाट पाहत उभाच होता. मुजावर यांना पाहताच 'तुम्हीच का मुजावर ?' असा सवाल केला. मुजावर यांनी होकार देत "तुम्ही कुठे नेमणुकीला आहेत ?" असा प्रश्न या भामट्याला विचारला तेंव्हा मात्र त्याची पंचाईत झाली. 'ततपप' ची अवस्था या भामट्या कथित पोलीस निरीक्षकाची झाली. मुजावर यांनी त्याला बरोबर हेरले. (Fake police officer arrested for deceiving police) त्याची उडवाउडवीची उत्तरे पाहून मुजावर यांनी त्याला ताब्यात घेतले आणि नंतर तोतया अमित जगन्नाथ कांबळे याने सगळी कबुलीच देऊन टाकली. 


पोलिसांनी या अमित कांबळेच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील केली आहे.  त्यानंतर त्याची बरीच माहिती पोलिसांना मिळाली असून पुणे, नगर, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात त्याच्यावर २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच त्याने कारागृहातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची देखील फसवणूक केली असून बदलीच्या नावाखाली तो गुगल पे द्वारे पैसे घेत होता अशी माहिती समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या अथवा अंतर्गत चौकशी सुरु असून त्यासाठी मदत करण्याचे कारस्थान करून हा पोलिसांनाच टोप्या घालत होता. अनेक पोलिसांना त्याने असा आर्थिक गंडा घातला आहे.  पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क करून तो पोलिसांचे फोन नंबर आणि अन्य माहिती घेत होता आणि नंतर त्याचा वापर पोलिसांना फसविण्यात करीत होता.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !