BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ जाने, २०२३

बेदम मारहाण करून जावयाचे हाड मोडले !

 


शोध न्यूज : माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या जावयाला बेदम मारल्याची घटना पंढरपूर तालुक्यात घडली असून याप्रकरणी चौघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 





जावई सासुरवाडीत गेला की त्याचे लाड आणि कोडकौतुक केले जाते, जावयाला हवे नको ते विचारले जाते आणि मोठ्या आपुलकीने त्याचा पाहुणचार देखील केला जातो परंतु पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मात्र जावयाचा वेगळ्याच पद्धतीने पाहुणचार झाला असून सासुरवाडीत जावयाला एवढी बेदम मारहाण करण्यात आली की त्याचे हाड मोडले आणि त्याला थेट रुग्णालय गाठावे लागले आहे. आपसातील वादातून पत्नी माहेरी गेली होती आणि  तिला परत आणण्यासाठी गेलेल्या पतीला सासुरवाडीत हा वेगळाच प्रसाद मिळाला आहे. 


सदर प्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील राहुल महादेव सावळे याचा विवाह सरकोली येथीलच अंजली यांच्याशी झाला आहे. मागील पंधरा दिवसापासून राहुल आणि अंजली या पतीपत्नीत काही वाद होऊ लागला होता त्यामुळे अंजली या गावातीलच आपल्या माहेरी निघून गेल्या होत्या. त्यानंतर राहुल सावळे हा आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी पत्नीच्या माहेरी गेला. तेथे गेल्यावर मात्र त्याला वेगळाच अनुभव मिळाला. राहुलचे सासरे बाळू हाबळे  यांनी जावई राहुल याला शिवीगाळ सुरु केली आणि "तू आमच्या दारात कशाला आला ?" असे विचारीत लोखंडी पाईप राहुल यांच्या डोक्यावर मारला. मेहुणा रविराज याने देखील काठीने मारहाण सुरु केली. 


पत्नीला नेण्यासाठी आलेल्या पतीला पत्नीच्या माहेरघरी ही मारहाण सुरु झाली होती. मेहुणा असलेल्या रविराज याने राहुलच्या हातावर, पायावर बेदम मारहाण सुरु केल्यामुळे राहुल खाली पडला. त्याचवेळी पत्नी अंजली आणि सासू सीमा या दोघीही या घटनेत आल्या आणि त्यांनीही लाथाबुक्क्यांनी राहुल यास मारहाण केली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. बराच वेळ हा मारहाणीचा प्रकार सुरु होता आणि काही वेळाने राहुल याचे वडील महादेव सावळे आणि कुमार सावळे तेथे पोहोचले. त्यांनी सुरु असलेल्या भांडणात मध्यस्थी करीत भांडण सोडवले. 


या मारहाणीत राहुल याला चांगलाच मार लागलेला असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. राहुल याला मारहाणीत लागलेला मार खूपच जादा असल्यामुळे त्याला पंढरपूर येथून उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुलच्या डाव्या हाताचे हाड मोडले असल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (son in law's bone was broken due to severe beating) पत्नी अंजली राहल सावळे, सासरा बाळू रामचंद्र हाबळे, सासू सीमा बाळू हाबळे व मेहुणा रविराज बाळू हाबळे या चौघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


राहुल सावळे यांच्या फिर्यादीवरून चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी सासू सीमा बाळू हाबळे यांनीही फिर्याद दिली आहे. आपण आणि आपले पती बाळू हाबळे हे दुचाकीवरून राहुल यांच्या घरासमोरून जात असताना राहुल याने दोघांना शिवीगाळ सुरु केली आणि 'पत्नीला सोडचिठ्ठी देण्यास सांगा' असे म्हणू लागला. त्यानंतर दुपारी पुन्हा घरी येवून पत्नी अंजली हिला काठीने मारहाण करू लागला. यावेळी आपण मध्ये पडलो असता आपल्यालाही काठीने पाठीवर, कमरेवर जबर मारहाण केली असून मार लागल्याने आपल्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. असे सीमा हाबळे यांनी म्हटले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !