शोध न्यूज : शिंदे गटाच्या आमदारांची दादागिरी थांबायला तयार नसून आमदार संतोष बांगर यांचे काही प्रकार वादग्रस्त ठरलेले असताना आता पुन्हा त्यांनी एका प्राचार्यांना मारहाण केल्याची धक्कादायक बाब चर्चेत आली असून या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होऊ लागला आहे.
राज्यात सत्तांतर होऊन फडणवीस - शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आणि शिंदे गटाचे एकेक आमदार, मंत्री सतत कुठल्या ना कुठल्या वादात चर्चेत राहिले आहेत. कुणाची मारहाण, कुणाच्या धमक्या अशी प्रकरणे सतत चर्चेत आहेत त्यात हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, मंत्री अब्दुल सत्तार यांची नावे कायम आघाडीवर राहिली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशा मंडळीना समज देत राहिले आहेत पण त्या प्रकारच्या घटनात काहीच फरक पडत नसल्याचे दिसत आहे. आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका प्राचार्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे अशा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नसून या आधीही मध्यान्ह जेवण पुरविणाऱ्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याचे प्रकरण गाजले होते. हिंगोलीमध्येच विमा कंपनी कार्यालयात तोडफोड झाली तेव्हा बांगर यांनी कृषी अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला होता. हिंगोलीचे कृषी अधीक्षक अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. वीज कापली म्हणून बांगर यांनी पवार नावाच्या एका कर्मचाऱ्याला रट्टे देईन अशी धमकी दिल्याचे प्रकरण देखील चर्चेत राहिले होते.
हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांना मारहाण केल्याचे आणखी एक प्रकरण गाजू लागले आहे. सदर प्राचार्य हे एका महिला प्राध्यापिकेस त्रास देत असल्याची एक तक्रार आमदार संतोष बांगर यांच्याकडे आली होती, त्यानंतर त्यांनी थेट तंत्रनिकेतन महाविद्यालयात जात प्राचार्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या घटनेची राज्यभर चर्चा सुरु झाली असून शिंदे गटाच्या विशेषत: आमदार संतोष बांगर यांच्या दादागिरीच्या एकेक कथा समोर येतच आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिली असल्याचे सांगितले जात असले तरी अशा घटना घडत असून यामुळे सरकारच्या प्रतीमेलाही मोठा धक्का लागत असतो. लोकप्रतिनिधींच्या दादागिरीचा जनतेच्या मनावर प्रतिकूल परिणाम होत असतो परंतु त्याचाही विचार करायला कुणी तयार नसल्याचे दिसत आहे.
सदर प्रकरणामुळे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचाविरोधात टीकेची झोड उठली असून सामान्य जनता देखील थक्क होऊ लागली आहे. कायदेमंडळात बसून आमदार कायदे तयार करतात आणि तेच आमदार बाहेर हे कायदे पायाखाली तुडवितात याचेच हे बोलके उदाहरण ठरत आहे. लोकप्रतिनिधी कायदा हातात घेवून त्याचे धिंडवडे काढणार असतील तर सामान्य माणूस कायद्याचा कसा आदर करील हे उघड होत आहे. (Elderly principal beaten up by MLA Sanjay Bangar of Shinde group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आता अशा घटनांना आवर घालावा अशी अपेक्षा करण्यापलीकडे जनतेच्या हातात सद्यातरी काही नसले तरी निवडणुकीवेळी जनता याचे उत्तर देणार आहेच. सतत अशा घटना घडू लागल्यामुळे मात्र सामान्य जनतेत देखील अस्वस्था पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !