BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जाने, २०२३

भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या !

 


शोध न्यूज : भीमा नदीच्या पात्रात आजोबापासून नातवापर्यंत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले असून ही सामुहिक आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला आहे.


पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदीच्या पात्रात एका पाठोपाठ एक असे मृतदेह आढळून येत होते. पाच दिवसात चार मुतदेह आढळून आले आणि यामुळे खळबळ उडाली असताना आणखी तीन मृतदेह आज आढळून आले. अचानक नदीच्या पात्रात हे मृतदेह आढळत असल्यामुळे एक गूढ निर्माण होत होते परंतु याची उकल होत गेली. चार मृतदेह हे पती, पत्नी, मुलगी आणि जावई यांचे असल्याचे निष्पन्न झाले आणि तीन मुले  बेपत्ता होती त्यामुळे त्यांचेही मृतदेह नदीच्या पात्रात आढळून येतील अशी शंका होती. त्याप्रमाणे आज तीन मुलांचेही मृतदेह आढळून आले आहेत. एकाच कुटुंबातील सात जणांचे हे मृतदेह असून ही घटना कशी घडली ? ही सामुहिक आत्महत्या आहे की काही घातपात आहे ? असे प्रश्न उपस्थित होत होते परंतु ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. 


एकाच कुटुंबातील पन्नास वर्षे वयाच्या आजोबापासून तीन वर्षे वयाच्या नातवापर्यंत सात जणांचा या सामुहिक आत्महत्येत समावेश आहे. या घटनेने पुणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र हादरून गेला आहे. दौंड तालुक्यातील पारगाव येथे ही घटना घडली असून एकाच कुटुंबातील सात मृतदेह पाहून मानवी मन प्रचंड वेदनेने हळहळू लागले आहे. पोलिसांनी या सर्व मृतदेहाची ओळख पटवली असून एकाच कुटुंबातील हे सगळे असल्याचे समोर आले आहे. मोहन उत्तम पवार (वय ५० वर्षे) संगीता मोहन पवार (वय ४५ वर्षे, दोघे रा.खामगांव ता. गेवराई), त्यांचे जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय ३२ वर्षे), त्यांची पत्नी राणी शामराव फुलवरे (अंदाजे वय २७ वर्षे), शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय ७ वर्षे), छोटू शामराव फुलवरे (वय ५ वर्षे) आणि कृष्णा (वय ३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.   


सदर दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार हा नेमका कशामुळे घडला ? आत्महत्या की घातपात ? असे काही प्रश्न उपस्थित होत असतानाच ही आत्महत्या असून त्याचे कारणही समोर आले आहे. मुलाने एका मुलीला पळवून नेल्याचे प्रकरण घडले त्यामुळे घराच्या सर्वानीच आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. प्रथमदर्शनी हे कारण सांगितले जात असले तरी ते अनेकांना न पटणारे वाटू लागले आहे. मुलगी पळवून नेल्याचे शल्य वडिलांच्या मनात असले तरी तीन लहान मुलांचे प्राण यात कसे गेले ? याचे उत्तर सद्यातरी मिळालेले दिसत नाही. मुलाच्या कृत्याने वडील अस्वस्थ होते आणि ते मुलाला समजावून सांगत होते. मुलगा ऐकत नसल्याने वडिलांनी दुसऱ्या मुलाला फोनवरून निर्वाणीचा इशारा दिला होता. 'मुलीला परत नाही आणले तर आम्ही विष प्राशन करू किंवा पाण्यात जीव देवू' असे ते म्हणाले असल्याचे समोर आले आहे. 


काहीही करून मुलगा ऐकत नाही म्हणून कुटुंबातील सर्वानीच १७ जानेवारी रोजी भीमा नदीच्या पात्रात सामुहिक आत्महत्या केली. यात सदर मुलाचे आई वडील, बहिण, जावी, बहिणीची तीन मुले यांचा समावेश आहे. नदी पात्रात यवत पोलीस आणि पुणे महानगरपालिकेची रेस्क्यू टीम कडून शोध मोहीम सुरू होती. एकेक मृतदेह सापडत राहिले आणि आज सर्वच्या सर्व सात मृतदेह आढळून आले आहेत (Seven members of the same family commit suicide in Bhima river) त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. एका कुटुंबातील सात जणांच्या सामुहिक आत्महत्येने महाराष्ट्र हादरून गेला आहे. 










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !