शोध न्यूज : सत्तेत असतानाही दादागिरी करणे एका आमदाराला महागात पडले असून प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध अखेर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या पन्नास आमदारांपैकी काही आमदार अत्यंत वादग्रस्त म्हणून समोर आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून काही आमदारांनी ताळतंत्र सोडले असून धमक्या, अपशब्द आणि प्रत्यक्ष कायदा हातात घेणे आणि पुन्हा त्याचे समर्थन करणे असे प्रकार वाढीस लागले असून त्यामुळे शासनाच्या प्रतिमेला देखील धक्का लागत असल्याचे दिसत आहे. अशा आमदारांत आमदार संतोष बांगर यांचा वरचा क्रमांक लागत असून आता मात्र त्यांना ही दादागिरी महागात पडताना दिसत आहे. सतत दादागिरीची भाषा वापरणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. त्यांच्यासह महाविद्यालयातील तीस ते चाळीस जणांच्या विरोधातही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता आणि राज्यभर या दादागिरीची चर्चा होत होती परंतु याप्रकरणी तब्बल दहा दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर शिवीगाळ करत मारहाण केली होती. यावेळी त्यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत होते. (A case has been registered against Shinde group MLA Santosh Bangar) प्राचार्यांना केवळ मारहाणच केली नसून तेथील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड आ. बांगर यांनी केली असून यात पाच हजार रुपयांचे नुकसान देखील केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक उपाध्याय यांनी पोलिसात बांगर यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणे, धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा करणे अशा प्रकारची कलमे या गुन्ह्यात लावण्यात आली आहेत.
सतत वादग्रस्त !
आ. संतोष बांगर हे सत्ता स्थापन झाल्यापासून सतत वादग्रस्त ठरत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना समज दिली होती असे सांगितले गेले होते परंतु त्यांच्या वर्तनात काहीच फरक दिसत नाही. आ. संतोष बांगर यांनी अलीकडेच मंत्रालयातील गेटवरील एका पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याची घटना चर्चेत आली होती. याप्रकरणी सदर पोलिसाने स्टेशन डायरीत नोंद केलेली होती. बांगर यांनी या घटनेचा इन्कार केला होता परंतु याची मोठी चर्चा झाली होती.
मारहाणीचे समर्थन !
प्राचार्य अशोक उपाध्याय यांना मारहाण केल्याचे प्रकरण राज्यभर चर्चिले गेले होते आणि अजूनही याची चर्चा सुरूच आहे. या घटनेचे पडसाद उमटू लागल्यानंतरही आ. बांगर यांनी या मारहाणीचे समर्थनच केले होते आणि 'आम्ही काही हातात बांगड्या भरल्या नाहीत' असे विधान त्यांनी केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र बांगर यांच्यावर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !