शोध न्यूज : सोलापूर शहरात जड वाहतुकीने आणखी एक बळी घेतला असून अवघ्या तीन वर्षाच्या बालकास त्याच्या आजी आजोबाच्या डोळ्यादेखत एका ट्रकने चिरडून मारल्याची घटना आज घडली आहे.
सोलापूर शहरात जड वाहतुकीची मोठी समस्या बनली असून वाहतूक पोलीस टीकेचे धनी होत असताना आज पुन्हा एका बालकाला जड वाहतुकीचा बळी पडावे लागले आहे. नुकतेच म्हणजे २२ जानेवारी रोजी सोलापुरात जुना पुना नाका येथे डंपर खाली चिरडून श्रीपाद पवन कवडे या १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेने शहरातून प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच आज दुपारी अशोक चौकाच्या दरम्यान आणखी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. तीन वर्षीय बालकाचा चिरडून मृत्यू झाला असल्याने नागरीकातून संताप तर नातेवाईकाचा आक्रोश पाहायला मिळाला. आजी आजोबाच्या सोबत एका कार्यक्रमासाठी निघालेल्या या बालकाला ट्रकने चिरडून मारले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ येथील असद अल्ताफ बागवान या तीन वर्षे वायच्या मुलाचा या अपघातात मृत्यू झाला असून हा अपघात अशोक चौक पोलीस चौकी ते अक्कलकोट नाका या दरम्यानच्या रस्त्यावर घडला आहे. आपल्या आजी आजोबांच्या सोबत सदर बालक दुचाकीवरून निघाला होता. सरदार बागवान आणि मुमताज बागवान हे कर्जाळ येथून अल्ताफ याला सोबत घेवून सोलापुरातील काजल नगर येथील नातेवाईकांच्या एका कार्यक्रमास जात होते. अशोक चौक मार्गाने ते निघाले असता खड्डे चुकवत पुढे निघाले होते. दरम्यान वळण घेताना पाठीमागून आलेल्या एका ट्रकने आजी आजोबासह या नातवाला देखील काही अंतर फरफटत नेले.
तानाबाना दुकानाच्या समोर झालेल्या या अपघातात मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला उडविले आणि त्यामुळे आजोबा बाजूला पडले पण आजी आणि नातू ट्रकच्या मागील चाकात अडकले गेले, ट्रकचे चाक आजीच्या हातावरून गेले तर अल्ताफ या बालकाच्या डोक्यावरून ट्रकचा टायर गेल्याने त्याचा चेंदामेंदा झाला. अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणारा हा अपघात पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येत होते. रस्त्यावरचा रक्ताचा सडा न पाहावाणारा होता. घटना घडताच जेल रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. पाच दिवसात शहरात हा दुसरा गंभीर अपघात झाला असून नागरीकातून संताव व्यक्त होत आहे.
मयत अल्ताफ याचा मृतदेह ताब्यात घेवून शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला परंतु प्रहार संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मात्र पोलीस आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. शहरात अवजड वाहने प्रवेश करतात याला पोलीस जबाबदार असून गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका प्रहार संघटनेने घेतली. मृताच्या नातेवाईकानी देखील अशीच भूमिका घेतली. (Accident! A three-year-old boy was crushed by a truck in Solapur city) मृत अल्ताफ याचे आई वडील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी अल्ताफची अवस्था पहिली तेंव्हा हंबरडा फोडला आणि किंकाळ्यांनी परिसर हेलावला होता. पाच दिवसात दुसऱ्यांदा असे दुर्दैवी चित्र सोलापुरात पाहायला मिळाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !