BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जाने, २०२३

पोलीस अधिकाऱ्यासह तिघेजण लाच प्रकरणात अडकले !

 



शोध न्यूज : बेकायदा फटाका कारखान्याचा विषय गाजत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एक पोलीस कर्मचारी आणि एक खाजगी व्यक्ती लाचप्रकरणी अडकले आहेत. 


पोलीस आणि महसूल विभाग सतत लाचखोरीबाबत चर्चेत असतो. त्यात नुकतेच पांगरी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत सुरु असलेल्या फटाका कारखान्यात स्फोट होऊन पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. हा कारखाना विनापरवाना सुरु होता परंतु प्रशासनाने कारवाई कशी केली नाही ? असा सवाल उपस्थित केला गेला आहे. प्रशासनावर ठपका ठेवत चौकशीची मागणी करण्यात आली असून अजूनही यातील आरोपी नाना पाटेकर अजूनही फरार आहे. पांगरी पोलिसांना तो सापडत नाही आणि अशा परिस्थितीत पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, एक पोलीस कर्मचारी सुनील पुरभाजी बोदमवाड यांच्यासह चहा कॅन्टीन मालक हसन इस्माईल सय्यद यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.


एका गुन्ह्यात नॉमिनल अटक करून जामिनावर सोडण्यासाठी तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली होती. तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या विरोधात पांगरी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या दोघांनाही न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. त्याना नॉमिनल अटक करून जामीनावर सोडण्यासाठी प्रत्येकी पंधरा हजार याप्रमाणे दोघांचे ३० हजार रुपये लाचेची मागणी तपास अधिकारी सपोनि. नागनाथ खुणे आणि त्यांचा दप्तरी पोलीस कर्मचारी सुनील बोदमवाड यांनी केली होती. लाचेची ही रक्कम चहा कॅन्टीन मालक हसन इस्माईल सय्यद यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. 


तक्रारदार यांनी लाच देण्यास होकार देऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याशी संपर्क साधून याबाबत तक्रार दिली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे आढळून आले त्यामुळे आज या विभागाने दुसरा सापळा लावला. यावेळी लाच घेताना चहा कॅन्टीन मालक हसन इस्माईल सय्यद (वय ६९) याने ही लाच स्वीकारली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि पोलीस कर्मचारी बोदमवाड अशा तिघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.        


सदरची कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार,  पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक,  पोलीस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलीस नाईक प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, शिपाई सलीम मुल्ला, गजानन किणगी,उडानशिव, शाम सुरवसे  यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे. (Police inspector, police constable red-handed in bribery case) या यशस्वी कारवाईमुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी गोत्यात आले असून सोलापूर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !